सध्या जगभरात ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हवामान बदलामुळे काही भागात जलप्रकोप तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आता या नव्या वर्षात तापामानाबाबत जागतिक हवामान संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. सुरू झालेले 2025 हे नवे वर्ष तापमानवाढीचे ठरणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका अधिक वाढला आहे.
वाढत्या प्रदूषणाने जगभरातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. 2024 पासून हे जागतिक तापमानवाढीचे वर्ष होते, त्याचप्रमाणे 2025 हे नवीन वर्ष देखील सर्वात जास्त उष्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) याबाबतचा धोक्याचा इशारा दिला आहे.
या वर्षीसारखेच विक्रमी तापमान 2025 मध्ये दिसून येईल असा अंदाज WMO ने वर्तवला आहे. यामुळे जगाला आगामी काही वर्षात अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. 2024 नंतर 2025 हे सर्वात उष्ण वर्षांपैकी एक असू शकते. त्याचा परिणाम जगभर दिसून येईल. गेले एक दशक आपण प्राणघातक उष्णतेतून जात आहोत. जे देश शांत आणि निरोगी भविष्यासाठी काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असे युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले.
या हवामान बदलाच्या आणि जागतिक तापमानवाढीच्या स्थितीतून आपण बाहेर पडलो नाही, तर भविष्यातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा गुटेरेस यांनी दिला आहे. तापमानवाढीचा धोका कमी करण्यासाठी 2025 मध्ये अनेक देशांना कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल. या संकटाचा सामना करण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तसेच स्वच्छ आणि शाश्वत उर्जा स्त्रोत वाढवण्यासाकडे लक्ष द्यायला हवे, असेही गुटेरेस म्हणाले.