13 डिसेंबर रोजी संसदेत घुसून काही तरुणांनी स्मोकबॉम्ब फोडले. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व तरुणांची गेल्या दीड महिन्यापासून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी या आरोपींपैकी पाच आरोपींनी दिल्ली सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करत त्यांचा छळ केला जात असल्याची माहिती न्यायालयाला दिली. ”आम्हाला इलेक्ट्रिक शॉक दिले जात आहेत. राजकीय नेत्यांना यात अडकवण्यासाठी आमचा छळ केला जात आहे”, असा आरोप या आरोपींना या प्रतिज्ञापत्रातून केला आहे.
सागर शर्मा, मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत व अमोल शिंदे या पाच जणांनी त्यांच्या वकिलामार्फत दिल्ली पातियाळा न्यायालयाचे अतिरिक्त न्यायधीश हरदीप कौर यांच्याकडे हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रातून त्यांचा होणारा छळ त्यांना न्यायधीशांसमोर मांडला आहे. ”आम्हाला इलेक्ट्रिक शॉक दिले जात आहेत, कोऱ्या कागदांवर आमच्या सह्या घेतल्या जातायत, आमच्या सोशल मीडिया अकाऊंटचे पासवर्ड घेतले जात आहेत, नाना प्रकारे आमचा छळ केला जात आहे जेणेकरून आम्ही आमचा गुन्हा मान्य करू तसेच एखाद्या राजकीय पक्षाशी आमचा संबंध असल्याचे मान्य करू”, असे त्यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
या पाच आरोपींसह नीलम आझाम या सहाव्या आरोपीला देखील बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 1 मार्चपर्यंत वाढवली आहे.
राजकीय नेत्यांची नावे घेण्यासाठी दबाव
या आरोपींच्या पोलिसांकडून पॉलीग्राफ, नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्या करताना चाचणी करणाऱी व्यक्ती ही राजकीय नेत्यांचे व राजकीय पक्षाचे नाव घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप त्या प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला आहे.