अंत्योदय योजनेचा लाभ गरजूंना द्या; अन्यथा आंदोलन, संगमनेर शिवसेनेचा इशारा

अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड आणि योजनेची अंमलबजावणी यासंदर्भात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. या योजनेचा लाभ गरीब झोपडपट्टीधारक, अल्पभूधारक, छोटे व्यवसाय, टपरीधारक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, विधवा, ज्येष्ठ नागरिकांना व पात्र गरजूंना देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही प्रांतधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे, गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसून, सध्या दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि बेरोजगारी यामुळे अंत्योदय योजनेतून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. मात्र, या योजनेचा लाभ गरजूंऐवजी नोकरदार व सधन लोक घेताना दिसतात. त्यामुळे अशा लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी. अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासंदर्भात असलेल्या शासन निर्णयाप्रमाणे गरजूंना देण्यात यावा, अन्यथा या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, अमोल डुकरे, दीपक साळुंके, त्रिलोक कतारी, मनोहर जाधव, प्रशांत खजुरे, रोहन कतारी, सागर कतारी, भोला पवार, अनुप म्हाळस, लक्ष्मी खिंची, साधना पवार, सुनीता मंडलिक आदींसह नागरिक उपस्थित होते.

अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड व त्याच्या अंमलबजावणी याबाबत प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. विधवा स्त्रिया, आजारी, अपंग किंवा साठ वर्षांवरील वृद्ध, ज्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही. सामाजिक आधार नाही, कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन नाही, आदिवासी कुटुंब, भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर, झोपडपट्टीतील रहिवासी, रोजंदारीवर काम करून उपजीविका करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावयास हवा; मात्र योजनेतील निकषाप्रमाणे लाभार्थी निवडले जात नसल्याचे दिसते.

अमर कतारी, माजी शहरप्रमुख शिवसेना