
सख्ख्या भावाची आणि चुलत भावाची निर्घृण हत्या करण्यात आली. आता आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांच्या भीतीपोटी मुलांना नातेवाईकांकडे ठेवलेय. गावात पाय ठेवला तर आमचा मृतदेहही सापडणार नाही. भाजपचा माजी आमदार आणि त्याचे नातेवाईक या सगळय़ांमागे आहेत. कित्येक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता विधानसभा अधिवेशनादरम्यान तरी न्याय मिळेल म्हणून आझाद मैदानात उपोषणाला बसलो तर आमरण उपोषणाची परवानगी नाही असे पोलीस म्हणाले. आमदार, मंत्र्यांना भेटूही दिले जात नाही. सरकारी अधिकाऱयांची गाठ घालून दिली, पण त्याचा उपयोग नाही. आम्हाला न्याय द्या, हत्येचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि एसआयटीकडे द्या, नाहीतर मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू, असा इशाराच अक्कलकोटमधील त्रस्त झालेल्या शेतकऱयांनी मिंधे सरकारला दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील माजी आमदार सिद्धराम आप्पा पाटील यांची प्रचंड दहशत असून गेल्या 20 वर्षांत तब्बल 20 हत्या करूनही समाजात उजळ माथ्याने वावरत असल्याचा आणि मालमत्तेसह विविध कारणांसाठी सुपारी घेऊन त्यांचा हत्येचा धंदाच असल्याचा आरोप अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी राजशेखर पोलाशे यांनी केला आहे. राजशेखर पोलाशे यांचा भाऊ हणमंतराव पोलाशे यांची 2010 मध्ये हत्या करण्यात आली; परंतु तपासात प्रगती नसल्याचा राजशेखर यांचा आरोप आहे. तर आणि धोंडापा पोलाशे यांचा भाऊ भीमाशंकर पोलाशे यांची हत्या गेल्या महिन्यात झाली. या प्रकरणात उमेश पोलाशे, सुरेश पोलाशे आणि मल्लाप्पा पोलाशे हे पोलीस कोठडीत आहेत; परंतु संतोष नेल्लुरे, बसवराज बिराजदार आणि भीमान्ना बिराजदार यांचाही हत्येत सहभाग असून त्यांनाही अटक करावी अशी धोंडापा पोलाशे यांची मागणी आहे.
जमिनीच्या वादातून हत्या
राजशेखर पोलाशे यांच्या आजोबांनी सिद्धराम आप्पा पाटील यांच्या नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली होती. ही जमीन कसून त्यांचे कुटुंबीय उदरनिर्वाह करत आहेत; परंतु आता ही जमीन आपल्या नावावर करून द्यावी, अशी मागणी सिद्दराम आप्पा पाटील यांचे नातेवाईक चंद्रकांत कालीभत्ते आणि हणुमंत भडोळे हे करत आहेत. हणमंतराव पोलाशे आणि कालीभत्ते तसेच भडोळे यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर कोल्हापूर येथून हणमंतराव पोलाशे हे बेपत्ता झाले. त्याला आम्हीच मारले असून तुला काय करायचे ते कर, तुम्हा सर्वांचाच काटा काढू अशी धमकी कालीभत्ते आणि भडोळे देत असल्याचा दावा राजशेखर पोलाशे यांनी केला. तसेच आरोपींना सिद्धराम आप्पा पाटील यांचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.