तिसरे मूल जन्माला घाला अन् बक्षीस मिळवा! लोकसंख्यावाढीसाठी आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना

आंध्र प्रदेश राज्यातील लोकसंख्या वाढावी यासाठी सरकारने एक नवी योजना जाहीर केली आहे. तिसरे मूल जन्माला घातल्यानंतर जोडप्याला बक्षीस दिले जाणार आहे. तिसरे मूल जन्माला आल्यानंतर ते जर मुलगी असेल तर तिच्या पालकांना 50 हजार रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. जर ते मूल मुलगा असेल तर पालकांना सरकारकडून एक गाय दिली जाणार आहे. तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार कालिसेट्टी अप्पलानाइडु यांनी ही घोषणा केली आहे. खासदारांच्या या विधानाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः कौतुक केले आहे.

खासदारांच्या विधानाआधी चंद्राबाबू नायडू यांनी लोकसंख्या वाढीचे समर्थन केले असून महिला कर्मचाऱयांना मुलांची संख्या कितीही असली तरी प्रसूती रजा दिली जाईल, अशी घोषणा केली होती. महिलांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घालावीत, असे आवाहनही नायडू यांनी याआधी केले होते. नायडू यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यातील लोकांच्या वाढत्या सरासरी वयाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले होते की, किमान दोन किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालावीत. सरकार असा कायदा करणार आहे की, ज्यांना दोन किंवा त्याहून अधिक मुले आहेत त्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येतील.

देशात तरुणांची संख्या घटतेय

हिंदुस्थानात तरुणांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या ‘युथ इन इंडिया-2022’ अहवालातून ही माहिती समोर आली होती. 2036 पर्यंत देशातील फक्त 34.55 कोटी लोकसंख्या तरुण राहील, जी सध्या 47 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच देशात 15 ते 25 वयोगटातील 25 कोटी तरुण आहेत. तरुणांची संख्या कमी होत असल्याने देश लवकरच म्हातारा देश म्हणून ओळखला जाईल, अशी भीतीही अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

स्टॅलिन म्हणतात, 16 मुले हवीत

तामीळनाडूतील लोकांनी 16 मुलांना जन्माला घालायला हवीत, असे विधान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केले होते. तसेच तामीळ लोकांनी आपल्या मुलांना तामीळ नावे द्यायला हवीत, असेही म्हटले होते. चेन्नईतील एका लग्न समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर स्टॅलिन यांनी हे विधान केले होते.