हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, शिवसेनेकडून संजय राऊत यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाने लढण्याचा प्रेरणा देण्याचे काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या देशातले महान नेतृत्व आणि महाराष्ट्राचे मराठी माणसांचे मानबिंदू, हिंदुहृदय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे. आज शिवसेनाप्रमुख आमच्यात नाहीत. पण त्यांनी जे स्वतःचे एक विश्व उभं केलं, मग मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्यासाठी केलेला संघर्ष असेल, या देशातल्या हिंदूंना गर्वाने जगण्याचा दिलेला मंत्र असेल आणि त्यातून हा महाराष्ट्र घडला आणि पिढ्या निर्माण झाल्या. हे बाळासाहेबांचं मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाने लढण्याचा प्रेरणा देण्याचे काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. आजही महाराष्ट्रातल्या पिढ्या बदलल्या, तरी येणारी प्रत्येक पिढी ही माननीय शिवसेनाप्रमुखांचं ऋण मान्य करून बाळासाहेबांचे विचार पुढच्या पिढीला देऊन पुढे जाते. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या देशाला, समाजाला आणि महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या. ते कधी स्वतः सत्तेवर आले नाहीत, म्हणजेच मुख्यमंत्री झाले नाहीत, राज्यपाल नाही झाले किंवा केंद्रात मंत्री झाले नाहीत. ही सगळी पदं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि सामान्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचे काम हे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय असे संजय राऊत म्हणाले.

तसेच ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहित आहेत, जे खरोखर बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे. माननीय शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेत आपला वेगळा गट निर्माण केला नाही. त्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे. जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे. बाजारात डुप्लिकेट ब्रॅण्ड आले असतील, शिवसेनेच्या नावाने चायना माल आला असेल तर तो तात्पुरता असतो. दिवाळीत चायनीज फटाके येतात, वात पेटली की नुसती फुसकी येते, वाजत नाहीत. अशा काही गोष्टी भाजपकडून निर्माण झाल्या आहेत. कारण भाजप हा चिनी माल आहे. त्यामुळे ते राजकारणात चीनी मालाचा पुरवठा करत असतात. पण हिंदुहृदयसम्राटांची जी शिवसेना आहे, ती अस्सल शिवसेना मातोश्रीत आहेत आणि मातोश्रीतून निर्णय होतात. बाकी कुणाला काय करायचे आहे ही तात्पुरती व्यवस्था आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना बाळासाहेबांबद्दल प्रेम निर्माण झालं आहे आणि त्यांनी ट्विट केलं आहे. अमित शहांना बाळासाहेब ठाकरे माहितच नाही. शिवसेनेने प्रतिकूल परिस्थितीत झुंज दिली आणि ही झुंज अमित शहांशीही देतोय हे लक्षात घ्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष, सामना करत आम्ही उभे आहोत. ती बाळासाहेबांनी दिलेली प्रेरणा आहे. मतांसाठी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं म्हणजे बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही. बाळासाहेब ठाकरे हे खरे हिंदुहृदयसम्राट होते, ते नकली हिंदुहृदयसम्राट नव्हते. ते हिंदुहृदयसम्राट होते. हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला. महाराष्ट्रात कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी लढा दिला, संघर्ष केला. आणि शिवसेनेसारखी कवचकुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली. ही कवचकुंडलं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी तोडली आणि तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. प्रतिकूल परिस्थितीश लढतोय ही बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आहे. आम्ही चोऱ्यामाऱ्या, लांड्या लबाड्या करून राजकारणात थांबलेलो नाही. बाळासाहेबांचा विचार होता, बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं. बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे, ढोंगावर प्रतिकार करणारे नेते होते. आणि या देशात हिंदुत्वाच्या नावाने राजकारणात ढोंग सुरू आहे, त्याचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना करत आहे. हाच बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे. माझं मोदी आणि शहांना आव्हान आहे ही ढोंगं बंद करा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन गौरव करा. तर तुम्ही खरे. ही शिवसेनेची मागणी आहे. मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून ज्या पदाला योग्य नाही अशा लोकांना भारतरत्न आपण दिलेले आहेत. पण ज्यांनी या देशात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे बीज रोवलं, वाढवलं त्या बाळासाहेबांना भारतरत्न का दिले नाही? 2026 ला बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. आपण वीर सावरकरांना भारतरत्न देऊ शकला नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिले तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आजही अशा पद्धतीने अस्तित्वात आहे की योग्य संधी पाहून तुमच्यावर हल्ला करेल. बाळासाहेब ठाकरेंचे विचार यांना माहित नाही. तुम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समजून नाही घेतले. मुंबई लुटणं एवढंच त्यांना माहित आहे, त्यासाठीच तुम्ही शिवसेना तोडली. बाळासाहेब ठाकरे आता असते तर त्यांना जोडे मारून हाकलून लावलं असतं. माझं संपूर्ण आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेले आहे, बाळासाहेब ठाकरे काय आहेत हे आम्हाला माहितीये. बाळासाहेब ठाकरेंनी आणिबाणीचे समर्थन केले होते, इंदिरा गांधींना आयर्न लेडी म्हटलं होतं. अमित शहांना हे माहित नसेल. बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेससोबत चांगले संबंध होते. बाळासाहेबांनी कधी द्वेषाचं राजकारण केलं नाही. बाळासाहेबांनी कधीही कुणाला आपलं व्ययक्तिक शत्रू नाही मानलं. बाळासाहेबांनी कधी राजकीय शत्रुत्व हे कुणाच्या कुटुंबापर्यंत नेलं नाही. बाळासाहेब हे ढोंगांचे सर्वात मोठे शत्रू होते. जे ढोंग करायचे त्यांना जोड्याने मारायचे
असेही संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला मिंधे गटाला लाज वाटली पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. हे निर्लज्ज लोक असून आजचा दिवस कलंकित करण्याचे काम मिंधे गट करत आहेत. मिंधे गटाने जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब हे बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार मिंधे गटात सामी होणार आहेत, हवंतर दावोसमधून जाहीर करावं. संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केले आहे आम्हाला प्रवेश द्या म्हणून, त्याच्या कॉपीज देतो आम्ही तुम्हाला. लाजा वाटत नाही का यांना? असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आभार यात्रा काढणार आहेत. शिंदे काय ईव्हीएमचे आभार मानणार आहेत की पैशाच्या बंडलांचे आभार मानणार? हे त्यांना विचारा. एकनाथ शिंदे हे माणसाच्या उंचीएवढे ईव्हीएम यंत्र बनवले आहे. महाराष्ट्रात हे ईव्हीएम लावून त्याचे आभार मानत शिंदे ठिकठिकाणी फिरणार आहेत. मणिपूरमध्ये नितीश कुमार यांनी पाठिंबा काढला परत दिला. हा त्यांचा आवडता खेळ आहे असेही संजय राऊत म्हणाले.