‘आमची माणसं परत द्या; आम्हाला न्याय द्या’; मृत भिक्षेकरूंच्या नातेवाईकांचा शिर्डी पोलिसांसमोर आक्रोश

शिर्डीत काही दिवसांपूर्वी धरपकड मोहिमेत ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी चार जणांचा नगर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संतप्त नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह अॅम्ब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून आक्रोश केला. ‘या वेळी आमची माणसं परत द्या, आम्हाला न्याय द्या’, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

शिर्डी पोलीस, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने महत्त्वाच्या सण, उत्सवकाळात भिक्षेकरूंची धरपकड मोहीम राबविली जाते. रामनवमी उत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर कारवाई करत 50 जणांना ताब्यात घेऊन कोर्टाच्या संमतीने त्यांची रवानगी विसापूर येथील भिक्षेकरू सुधारगृहात करण्यात आली होती. त्यातील दहा जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यातील अशोक बोरसे, इसाक शेख, प्रवीण घोरपडे आणि सारंगधर वाघमारे या चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तसेच दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, चारजणांनी रुग्णालयातून पलायन केले आहे.

मयतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत प्रशासनाने मारहाण करत त्यांना रुग्णालयात बांधून ठेवल्याचा आणि जेवण-पाणी न दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मयतांपैकी इसाक शेख आणि सारंगधर वाघमारे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अॅम्ब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून एकच आक्रोश केला. ‘आमची माणसं भिक्षेकरी नसताना प्रशासनाने त्यांना उचलून नेले आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना जसे उचलून नेले तसेच परत आणून द्या’, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही, तर प्रशासनाविरोधात लढा उभारण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, तर घटना घडल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

भिक्षेकरूंचा मृत्यू संशयास्पद; सीसीटीव्ही फुटेज सादर करा
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या चार भिक्षेकरूंचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर खासदार लंके यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेत संताप व्यक्त केला होता. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकरूंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना संशयाच्या भोक्ऱ्यात आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत लंके यांनी अपघात वॉर्ड नंबर १, बेगर वॉर्ड, भिक्षेकरूंना ठेवण्यात आलेल्या किंवा उपचार केलेल्या खोलीमधील सीसीटीव्ही फुटेज, भिक्षेकरूंवर करण्यात आलेल्या उपचाराचा तपशील, आयपीडी पेपर यांची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.