
दोन आठवडय़ात सर्व बेघर रहिवासीयांना निवारा उपलब्ध करून द्या आणि एका वरिष्ठ पातळीवर या सर्व प्रकरणाची सखोल तपासणी करून अहवाल सादर करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी आज पोलीस आणि महापालिका अधिकाऱयांना दिले. काँग्रेस नेते नसीम खान यांच्यासह जयभीमनगरच्या रहिवाशांसह झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पवईतील हिरानंदानी येथील जयभीमनगर मध्ये 25-30 वर्षांपासून राहत असलेल्या अंदाजे 650 मागासवर्गीय परिवारांना विकासकांनी महापालिका व पोलीस यांच्याशी हातमिळवणी करून मारहाण केली तसेच त्यांच्या घरांवर बुलडोजर चालवून बेघर केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवडयापूर्वी पालिका आणि मुंबई पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, दोन आठवडयानंतरही काहीच कारवाई न झाल्यामुळे अध्यक्षांच्या दालनात आज नसीम खान यांच्यासह जयभीमनगरच्या रहिवाशांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरविकास विभागाचे अधिकारी, अतिरिक्त पालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ 10, पालिका उपायुक्त परिमंडळ 6, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेच्या एस विभागाचे साहायक पालिका आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच प्रकाश बि-हाडे, अशोक गायकवाड, निलेश वाघमारे, रोहित कांबळे, अँड. सिब्ते हसन खान, राकेश सिंह तसेच जयभीमनगरचे रहिवाशी उपस्थित होते.