
कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार केल्यामुळे एका प्रवाशाला आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बडनेरा ते नागपूरदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी सत्यजित बर्मन यांनी कल्याण रेल्वे स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
अंबरनाथ येथे राहणारे सत्यजित बर्मन हे गीतांजली एक्स्प्रेसमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. एक्स्प्रेसमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या या एमआरपीपेक्षा जास्त किमतीत विकल्या जात असल्याचे बर्मन यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी तक्रार केली. याचवेळी त्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा वाद झाला व या वादातूनच त्यांना मारहाण करण्यात आली. सत्यजित बर्मन यांच्या तक्रारीनुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हा गुन्हा बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
निकृष्ट आणि भेसळ
मेल, एक्स्प्रेसमध्ये खाद्यपदार्थ आणि पाणी विक्री याबाबत आयआरसीटीसीच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत. तरीही फेरीवाले आणि आयआरसीटीसीचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना, पोलिसांना पैसे देऊन चढ्या दराने निकृष्ट आणि भेसळ असलेले खाद्यपदार्थ विकतात.