
आंतर रुग्णालयीन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या गिरनार क्रिकेट स्पर्धेत हिंदुजा रुग्णालयाने प्लेट ग्रुपच्या अंतिम सामन्यात ग्लेनेलगेस रुग्णालय संघाचा 80 धावांनी दारुण पराभव करीत आपल्या अठराव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हिंदुजा संघाने नंदू पाटील (50), भूषण पाटील (21) यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 141 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. त्यानंतर 142 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ग्लेनेलगेस रुग्णालयाचा अवघ्या 61 धावांत खुर्दा पाडला आणि जेतेपदाच्या लढतीत 80 धावांच्या दणदणीत विजयाची नोंद केली. या स्पर्धेवर आतापर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या हिंदुजाचे हे 18वे जेतेपद आहे. हिंदुजाकडून प्रशांत हिरोजीने 4 विकेट टिपल्या. तसेच नंदू पाटील, विजय यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेत आपली कामगिरी चोख बजावली. अष्टपैलू कामगिरी करणारा नंदू पाटील सामनावीर ठरला.