प्रेयसीने प्रियकराला दिला गुलीगत धोका, शॉपिंगवर उडवले 80 लाख रुपये

प्रेयसीने आपल्या प्रियकराला लग्नाचे स्वप्न दाखवून त्याला तब्बल 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मध्य प्रदेशातील रिवा येथे उघडकीस आली आहे. लग्नाच्या आधीच प्रेयसीने डायमंड, आयफोन, महागडी घडय़ाळे, हँडबॅग, सँडल अन् भरभरून ऑनलाईन शॉपिंग केली, परंतु 80 लाख रुपयांचा चुना लावल्यानंतर प्रेयसीने प्रियकराला गुलीगत धोका दिला अन् तिच्या जुन्या प्रियकरासोबत तिने लग्न केले. यामुळे फसवणूक झालेल्या प्रियकराने थेट पोलीस स्टेशन गाठून प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली. प्रेयसीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रेयसी फरार झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीने साडेतीन वर्षे जवळपास 45 लाखांची शॉपिंग केली. तसेच तिला डायमंडची अंगठी, आयपह्न, हँडबॅग, महागडा गॉगल, कपडे आणि लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या.

प्रेयसी फरार

विवेक शुक्ला असे प्रियकराचे नाव असून आस्था असे या प्रेयसीचे नाव आहे. साडेतीन वर्षांपूर्वी आस्थासोबत भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या कुटुंबाला हे प्रेम प्रकरण माहिती होते. तिचे मामा माजी आमदार आहेत. तसेच वडील एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. पोलिसांनी प्रियकराच्या तक्रारीनंतर प्रेयसीवर 430 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे.