बीडमधील तरुणाच्या खुनानंतर विवाहित प्रेयसीची आत्महत्या

बीड येथील युवक रणजित गिरी याचा खून करून मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्याची घटना सोमवारी (दि.23) घडली होती. यानंतर रणजितवर प्रेम करणारी युवती मयुरी संतोष जाधव (रा. खांडवी, ता. कर्जत) हिने आज दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

बीड येथील रणजित सुनील गिरी या युवकाचा नाजूक संबंधांमधून दोरीने गळफास देऊन खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्यात आले होते. मात्र, नांदगाव गावच्या शिवारामध्ये कालव्यामधून मृतदेह वाहून जात असताना, नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. या खुनाचा तपास करून पोलिसांनी संतोष बाबूराव जाधव (रा. खांडवी, ता. कर्जत), ऋषिकेश रवि बोरकर (रा. वडझिरे, ता. पारनेर), उद्धव ऊर्फ संतोष अण्णासाहेब मांडगे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्यासह खांडवी येथील महिलेला अटक केली होती. आरोपींमध्ये मयत मयुरीचे आई- वडील, नवरा व एका नातेवाईकाचा समावेश आहे.

दरम्यान, ज्या युवतीच्या प्रेमप्रकरणातून रणजित गिरी याचा खून झाला, ती मयुरी संतोष जाधव (वय 18) हिने आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मूळचा बीड येथील रणजित गिरी हा युवक हॉटेलवर आचारी म्हणून काम करत होता. त्याच्यावर मयुरीचे प्रेम होते. मात्र, मयुरी अल्पवयीन असल्यामुळे कुटुंबीयांनी रणजित याच्यावर मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे रणजितला अटक झाली होती. तीन महिन्यांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतरही हे प्रेमप्रकरण पुढे सुरूच होते. त्यामुळे मयुरीचे आई-वडील, नवरा आणि एका नातेवाईकाने मिळून रणजित याचा खून करून मृतदेह कालव्यात टाकला होता. आता यातील मयुरी जाधव हिने आत्महत्या केल्याने या खूनप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.