आजकालचं मानवी जीवन हे फार धकाधकीचं झालं आहे. शहरी भागात होणाऱ्या ट्रॅफिकमुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. यामुळे लोक स्वत: च्या गाड्या असतानाही या ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी रॅपिडो बाईकचे बुकींग करतात. जेणेकरून वेळ वाया न जाता सुरक्षितपणे योग्य वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येईल. मात्र बेंगळुरूतील एक मुलीला ही रॅपिडो राईड बुक करणं चांगलच महागात पडलं आहे. या घटनेची माहिती तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यनातून दिली आहे.
28 जून रोजी ही घटना घडली असून अमिषा अग्रवाल असे त्या मुलीचे नाव आहे. अमिषा गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी अमिषाने रॅपिडो बाईक बुक केली. या बाईकचा चालक भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत गाडी चालवत होता. त्यामुळे अमिषा थोडी घाबरली होती. दरम्यान कडुबीसनहल्ली (बेंगळुरू) मधील आऊटर रिंग रोडवर,चालकाने कोणतेही इंडिकेटर न देता बाईक अचानक सर्व्हिस लेनकडे वळवली.
Never taking a Rapido bike again 🙂 pic.twitter.com/EAwkyCjfb1
— Amisha Aggarwal 📌 (@awwmishaaa) June 30, 2024
दरम्यान समोरून एक कार येत होती. यावेळी कार आणि रॅपिडो बाईकची धडक झाली आणि बाईक चालकाचे नियंत्रण सुटून अमिषा आणि चालक दोघेही पडले. अपघात घडताच रॅपिडो चालकाने बाईक आहे त्या अवस्थेत सोडून तेथून पळ काढला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी अमिषाला तात्काळ रुग्णालयात नेले. या अपघातात अमिषाच्या पायाला दुखापत झाली आहे. याचे काही फोटो तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केले असून आपण पुन्हा कधीच रॅपिडो बुक करणार नसल्याचे तिने त्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.
अभिलाषा अग्रवालने रॅपिडोच्या कस्टमर केअरच्या माध्यमातून कंपनीकडे नुकासान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सोबतच तिने कंपनीला अर्जही केला आहे. अमिषाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सनी रॅपिडोच्या गैरवर्तनाबाबत रोष व्यक्त केला आहे.