मोबाईल जास्त बघू नको, अभ्यास कर सांगितल्याने मुलीची आत्महत्या

‘मोबाईल जास्त बघू नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे,’ या आईच्या क्षुल्लक बोलण्याचा राग मनात ठेवून नंदिनी गुप्ता या 15 वर्षीय मुलीने मोठागाव येथील माणकोली पुलावरून खाडीत उडी मारत आत्महत्या केली. दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नंदिनीचा मृतदेह शनिवारी खाडीकिनारी सापडला. क्षुल्लक कारणातून मुलीने आपले जीवन संपवल्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत आहे.

नंदिनी आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिम येथील उमेशनगर भागात राहत होती. तिचे वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात, तर ती शाळेत शिक्षण घेत होती. नेहमी हातात मोबाईल पाहत असल्याने आईने 5 डिसेंबर रोजी तिला ‘मोबाईल जास्त पाहू नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे’ असे सांगितले. आईच्या या बोलण्याचा राग आल्याने तिने आत्महत्या केली.

संध्याकाळपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. ती कोठेही सापडली नाही. मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या वडिलांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एका मुलीने मोठागाव येथील माणकोली पुलावरून उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खाडीमध्ये शोधमोहीम राबवूनही तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेर शनिवारी मोठागाव खाडीकिनारी नंदिनीचा मृतदेह सापडला.