महाराष्ट्राला लाचारीचा नाही, स्वाभिमानाचा वारसा! विधानसभा निवडणुकीत महायुतीला धडा शिकवण्याचा गिरणी कामगारांचा निर्धार

डबल इंजिनचे महायुती सरकार सर्व पातळय़ांवर फेल ठरले. या सरकारने गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना मुंबईतून हद्दपार केले. बिल्डरांच्या घशात जमिनी घालणाऱया महायुतीला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू, असा निर्धार कामगार नेते का@. उदय भट यांनी रविवारी गिरणी कामगारांच्या मेळाव्यात जाहीर केला. महायुतीने पुन्हा सत्तेत येण्यासाठी महिलांना दीड हजाराची लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्राला लाचारीचा नाही, तर स्वाभिमानाचा वारसा आहे, असे का@. भट यांनी महायुतीला ठणकावून सांगितले.

गिरणी कामगारांच्या सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने रविवारी दादर पूर्वेकडील प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृहात गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मोठय़ा प्रमाणावर गिरणी कामगार हजर होते. यावेळी कॉ. उदय भट यांच्यासह कॉ. बी. के आंब्रे, कॉ. विजय पुलकर्णी, हेमंत गोसावी, कॉ. निंबाळकर, कॉ. दत्तात्रय ताकवणे, कॉ. विठ्ठल मोरे, कॉ. संतोष मोरे, रमाकांत बने, हरिनाथ तिवारी, कॉ. दत्तात्रय अत्याळकर, बबन मोरे, बाळा खवणेकर आदींनी भाषणे केली. महायुती सरकारने 15 मार्च व 16 सप्टेंबरच्या शासन निर्णयाद्वारे गिरणी कामगार व वारसदारांचा मुंबईतील घराचा अधिकार काढून घेत त्यांना मुंबईतून हद्दपार केले. महायुतीच्या या निर्णयावर कामगार नेत्यांनी जोरदार टीका केली.

कामगार कल्याणाच्या तरतुदींची पायमल्ली

महायुतीने गिरणी कामगार व वारसदारांचा विश्वासघात केला. मुंबईतील खासगी गिरण्यांच्या जागा तसेच एनटीसी, पेंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या जागा अदानीसारख्या बिल्डरांच्या घशात घातल्या. गिरणी कामगारांच्या कल्याणाच्या तरतुदींची पायमल्ली केली. गिरणी कामगारांचे मुंबईतच पुनर्वसन करण्यासाठी जमिनी उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. तसे न करता कामगारांना मुंबईतून हद्दपार केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीला धडा शिकवणार, असा निर्धार एकजुटीने करण्यात आला.

गिरणगावासह राज्यभर ठिकठिकाणी रॅली काढणार

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्याच दृष्टीने महायुतीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रणनीती आखण्यात आली. गिरणगावासह संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येणार आहेत. सर्वप्रथम 10 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता करी रोड येथील महाराष्ट्र हायस्पूल मैदानात जमून गिरणगावात रॅली काढली जाणार आहे. अशा प्रकारे राज्यभरात ठिकठिकाणी रॅली काढून महायुतीला धडा शिकवण्याचे आवाहन मतदारांना केले जाणार आहे.