
मेट्रो तसेच सर्व्हिस रोडच्या कामामुळे आधीच वाहतुकीचा लोच्या झाला असताना आज घोडबंदर रोडचे तब्बल दहा तास अक्षरशः ‘रस्ते’ लागले. गायमुख घाटामध्ये मध्यरात्री पाऊणच्या सुमारास राख घेऊन जाणारा ट्रक बंद पडल्याने संपूर्ण घोडबंदरच जाम झाला. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत वाहतूककोंडीने प्रवाशांचा श्वास गुदमरला. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचेही अतोनात हाल झाले. गायमुखपासून कापूरबावडीपर्यंत रस्त्यावर एवढी प्रचंड कोंडी झाली होती की चालणेही मुश्कील झाले. दरम्यान, घोडबंदरची अवस्था ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली असून ट्रॅफिक जाममधून सुटका होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल ठाणेकरांनी केला आहे.
नाशिकहून 50 टन राख घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास गायमुख घाटामधील नीरा केंद्राच्या चढणीवर अचानक बंद पडला. त्या ट्रकची पाहणी करीत असतानाच पाटे, जॉइंट तुटले होते. शिवाय प्रेशर पाइपही फाटला होता. तसेच बुस्टर तुटल्याने तो ट्रक दोन क्रेन लावून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ट्रक काही हलतच नव्हता. त्यातच घोडबंदर रोडवर मेट्रोचे काम सुरू आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला.
- घोडबंदर रोडवरील एका वाहिनीवर वाहतूककोंडी झाल्याने दुसऱ्या वाहिनीवर बसवण्यात आलेले काही बॅरिकेड्स पोलिसांनी काढून कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला, पण सकाळी चाकरमान्यांची कामावर जाण्याची घाई सुरू झाल्याने वाहतूककोंडीत भर पडली.
- सकाळीच घोडबंदर रोडवरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. यामुळे गायमुख येथून कापूरबावडी नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
- उड्डाणपुलांवरदेखील गाड्याच गाड्या दिसत होत्या.आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त ट्रक बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.