
कशासाठी… पाण्यासाठी, आश्वासन नको पाणी द्या, अशा घोषणा देत आज ठाण्याच्या घोडबंदर पट्ट्यातील असंख्य आदिवासी बांधवांनी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर हंडा मोर्चा काढला. ठाण्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने आदिवासी महिलांनी डोक्यावर रिकामे मडके आणि हंडे घेऊन महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
माजिवडा येथील आदिवासी वस्ती-पाड्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी याकरिता सातत्याने लेखी निवेदन देऊन आणि पाठपुरावा करूनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीबाहेर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी आदिवासी बांधवांच्या वतीने पाणी समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. भरउन्हात आदिवासी महिलांनी मोर्चात सहभाग घेतला होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी येथे ठिय्या मांडला होता. मागील कित्येक वर्षांपासून घोडबंदर भागातील पानखंडा, बाबनोली पाडा आदींसह इतर 13 आदिवासी पाड्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. वनविभागाच्या हद्दीत येथील पाडे असल्याने त्यांना पाणी देता येत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
- या प्रमुख मागण्या
- प्रत्येक कुटुंबाला त्याच्या राहत्या घरात पाणी नळजोडणी तातडीने मंजूर करून पाणीटंचाईमुक्त गावपाडे करण्याचा ठराव करावा.
- जागेचा अडथळा निर्माण होत असलेल्या ठिकाणी बोअरवेल मारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
सुरू असलेल्या पाइपलाइनला वाढीव नळजोडणी करण्यात येऊ नये. - ज्या भागात जलवाहिन्या लहान आहेत त्यांची क्षमता वाढवावी.