जगभरात घिबली ट्रेंड सुसाट! अवघ्या 13 दिवसांत 70 कोटींहून अधिक बनवले फोटो

चॅट जीपीटीच्या घिबली स्टाईलने भल्याभल्यांना वेड लावले आहे. जगभरात घिबली स्टाईल फोटो अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. लाखो लोक रोज आपल्या खऱ्या फोटोला घिबली स्टाईलमध्ये बदलून सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करत आहेत. जगभरात अवघ्या 13 दिवसांत 70 कोटींहून अधिक लोकांनी घिबली फोटो बनवून ते सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती समोर आली आहे.

घिबली फोटोची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांची मागणी वाढल्याने ओपनआयच्या सर्व्हरवर आणि जीपीयूवर खूपच लोड आला आहे. हिंदुस्थानात खासदारांपासून आमदारांपर्यंत आणि सरकारी कर्मचाऱ्यांपासून पोलिसांपर्यंत सर्वांनाच घिबलीने भुरळ घातली आहे. घिबली फोटो बनवण्यात महिलांचाही जास्त सहभाग दिसत आहे.

हिंदुस्थान सर्वात पुढे

ओपन एआयच्या चॅटबॉट जीपीटीवर 25 मार्चपासून घिबली फोटोला सुरुवात झाली. आतापर्यंत 130 मिलियन म्हणजेच 13 कोटी यूजर्संनी 70 कोटींहून अधिक घिबली फोटो बनवले आहेत. घिबली फोटो बनवण्यात हिंदुस्थान सर्वात पुढे आहे, अशी माहिती ओपन एआयचे सीओओ ब्रॅड लाइटपॅप यांनी दिलीय. हिंदुस्थानात या फीचरची क्रेझ प्रचंड वाढत आहे. हिंदुस्थानातील लोक दिवस-रात्र घिबली फोटो बनवत आहेत, असे त्यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

घिबली शब्दावरून सोशल मीडियावर मतमतांतरे दिसत आहेत. कोणी घिबली तर कोणी गिबली अन् जिबली असेही म्हणताना दिसत आहेत. परंतु, घिबली शब्दाचा उच्चार जपान आणि इटलीत वेगवेगळा आहे. जपानी भाषेत जीच्या जागी जे चा उच्चार केला जातो. तर एलच्या जागी आरचा उच्चार केला जातो. जपानी भाषेत जिबरी म्हटले जाते. तर इटालियन भाषेत गिबली म्हटले जाते.