घाटकोपर हार्ंडग दुर्घटनेवरून विधानसभेत खडाजंगी; सर्व होर्डिंग्जचे दरवर्षी सक्तीने स्ट्रक्चरल ऑडिट करा, शिवसेनेची मागणी

घाटकोपर हार्ंडग दुर्घटनेवरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. घाटकोपर छेडा नगरमधील हार्ंडगला परवानगी देणाऱया अधिकाऱयांवर कडक कारवाई करा आणि मुंबईच नव्हे तर मुंबई महानगर प्रदेशातील सर्व हार्ंडग्जचे दरवर्षी सक्तीने स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली. त्यावर सर्व हार्ंडगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील आणि जे निकषात बसत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. घाटकोपर छेडा नगरमध्ये 13 मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी सुरू आहे. या हार्ंडगबद्दल संबंधित प्रशासनांना 14 पत्रे लिहिली होती, परंतु एकानेही उत्तर दिले नव्हते, असे आव्हाड यांनी सांगितले. हार्ंडग ज्या जागी होते ती खरंतर रेल्वे पोलीस वसाहतीची जागा होती, अशी माहिती आपल्याला म्हाडामधून मिळाली. नंतर तिथे पेट्रोल पंप कसा आला, कुणी मंजूर केला माहीत नाही. हे अवाढव्य हार्ंडग उभारण्यासाठी केवळ सहा फूट खोल खड्डे करून कॉंक्रिट टाकले गेले होते. ते स्ट्रक्चर महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱयाने मंजूर केले, कोणी परवानगी दिली, असा सवाल करतानाच तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त पैसर खालीद यांना त्या प्रकरणी निलंबित केले गेले, मग पालिका अधिकाऱयांवर कारवाई का नाही, असा जाब आव्हाड यांनी विचारला. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्याला उत्तर दिले. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व हार्ंडग्जचे 30 दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले जातील, असे सामंत यांनी सांगितले.

तुमचे तडीपार गुंडांबरोबर पह्टो आहेत – अजय चौधरींचा भाजपवर हल्ला
घाटकोपर येथे दुर्घटना झालेल्या हार्ंडगला कोविडच्या काळात महाविकास आघाडी सरकारकडून परवानगी दिली गेली असा आरोप या वेळी भाजपचे राम कदम, नितेश राणे यांनी केला. या वेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला. त्यावर शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी संतप्त झाले. विरोधकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही. झोप येत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतात, असे आमदार चौधरी म्हणाले. होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत पह्टो आहेत अशा आरोपालाही चौधरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तुमचे तडीपार गुंडांसोबत पह्टो आहेत, असा तडाखा लगावत भाजप आमदारांची बोलती बंद केली.