भीक मागायच्या बहाण्याने घरात घुसून हातसफाई, किमती ऐवज चोरणाऱ्या दोन महिला गजाआड

भीक मागायच्या बहाण्याने फिरायचे व घराचा दरवाजा उघडा बघून आत घुसायचे आणि मोबाईल, किमती ऐवज घेऊन पसार व्हायचे. अशाप्रकारे चोऱ्या करणाऱ्या दोघा महिलांना घाटकोपर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे आठ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

घाटकोपरच्या भटवाडी येथील हाजी अली चाळीत राहणारे गोकुळ शिंदे यांच्या घरातून 90 हजार किमतीच्या दोन मोबाईलची चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर घाटकोपर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. मग वरिष्ठ निरीक्षक काळदाते, निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. वैलास तिरमारे, देवार्डे, पंक, बोराडे, नागरे, कवळे, भिवसणे या पथकाने  घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून मोबाईल चोरणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले.

मोबाईल चोरले दोन, हस्तगत केले आठ

 चौकशीत त्यांनी दोन महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली. दिव्या पवार (22) आणि सीमा पवार (20) अशी त्या दोघींची नावे असून त्या मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. त्या दोघींकडून 74 हजार 500 रुपये किमतीचे आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले. हे पह्न त्यांनी गोरेगाव, साकीनाका, अंधेरी व घाटकोपर परिसरातील उघडय़ा असलेल्या घरातून चोरल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे.