घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना ‘देवाची करणी’ नव्हती, तर याला मानवी कृत्यच जबाबदार ठरले. जोराच्या वादळी वाऱयामुळे दुर्घटना घडल्याचे म्हणता येणार नाही, अशा शब्दांत सत्र न्यायालयाने होर्डिंग लावणाऱयांचे कान उपटले. ही घटना गंभीर असून सखोल तपासासाठी या गंभीर गुह्यात सकृतदर्शनी सहभाग असलेल्या आरोपींची अटक आवश्यकच आहे, असे न्यायालयाने म्हटले.
‘इगो मीडिया’ जाहिरात पंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांनी फेटाळला. त्या निर्णयाच्या सविस्तर आदेशपत्रात न्यायालयाने विविध निरीक्षणे नोंदवली. घाटकोपरमध्ये 13 मे रोजी महाकाय होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू, तर 80 हून अधिक जखमी झाले. जोराच्या वादळी वाऱयामुळे होर्डिंग कोसळले. याला मानवी कृत्य जबाबदार नाही, असा दावा जान्हवीने केला होता. हा दावा अमान्य करीत न्यायालयाने मानवी कृत्यच जबाबदार ठरल्याचे निरीक्षण नोंदवले. जान्हवीचा होर्डिंग उभारण्यात सक्रिय सहभाग होता. दुर्घटनेनंतर ती फरार झाली होती व पोलिसांना सहकार्य करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे यापुढे तपासात सहकार्य करण्याबाबत दिलेला शब्द स्वीकारू शकत नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने जान्हवीचा अर्ज फेटाळला.
जबाबदारी झटकू शकत नाही
होर्डिंग उभे करण्यापासून ते कार्यान्वित करेपर्यंत जान्हवी संबंधित कंपनीची संचालक होती. नंतर 21 डिसेंबर 2023 रोजी तिने राजीनामा दिला. मात्र राजीनाम्याचे कारण देऊन ती जाहिरात कंपनीत कार्यरत असताना उभारलेल्या होर्डिंगची जबाबदारी झटकू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
पाच लाख रुपये व आलिशान कारची ‘गिफ्ट’
जान्हवी मराठेला पाच लाख रुपये व एक आलिशान कार मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा तपास अधिकाऱयांनी न्यायालयात केला. यासंबंधी कागदपत्रे पाहता ‘जान्हवी केतन सोनाळकर’ या नावाने रकमा जमा झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.