लग्न करा अन्यथा नोकरीचा राजीनामा द्या! चीनमध्ये कंपनीची कर्मचाऱ्यांसमोर अजब अट

चीनमधील कंपनीने कर्मचाऱ्यांसमोर अजब अट ठेवली आहे. लग्न करा नाहीतर नोकरीचा राजीनामा द्या, असे फर्मान चीनमधील कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना काढले आहे. कर्मचाऱ्यांनी वेळीच लग्न करावे, यासाठी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लग्न करण्यासाठी एक डेडलाईनसुद्धा दिली आहे. यासाठी कंपनीने एक नोटीस जारी केली आहे. कंपनीच्या या नोटिसीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कंपनीच्या नोटिसीनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी हातातील महत्त्वाचे काम सोडून मुलगी शोधणे सुरू केले आहे. कंपनीने दिलेल्या मुदतीपूर्वीच लग्न उरकण्यासाठी अनेक जण आता कामाला लागले आहेत. कंपनीच्या अजब डेडलाईनमुळे अनेक जणांना धक्का बसला आहे. ज्यांचे लग्न झाले आहे ते कर्मचारीसुद्धा धक्क्यात आहेत. कंपनी उद्या मुलांना जन्माला घालण्यासाठी डेडलाईन देऊ शकते, तसेच नोटीस काढू शकते, अशी भीती कर्मचाऱ्यांना सतावत आहेत. कंपनीने जारी केलेली नोटीस सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर त्याची शासन स्तरावर दखल घेण्यात आली.

सप्टेंबरपर्यंत लग्न उरका!

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या शँडोंग प्रोविन्समध्ये द शुंतीयन केमिकल ग्रुपची ही कंपनी आहे. या कंपनीत 1200 कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीने कर्मचाऱ्यासाठी एक नोटीस जारी केली आहे. 28 ते 59 वयाच्या कर्मचाऱ्यांचे लग्न झाले नाही किंवा जे घटस्फोटित आहेत त्यांनी सप्टेंबरपर्यंत लग्न करावे, अन्यथा नोकरीचा राजीनामा द्यावा, असे कंपनीने कर्मचाऱ्यांना बजावले आहे. जर सप्टेंबरपर्यंत अविवाहित कोणी दिसल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाईल, असेही कंपनीने आपल्या नोटिसीत म्हटले आहे. कंपनीच्या या नोटीसमुळे कर्मचारी चांगलेच घाबरले.

अधिकारी आले मदतीला

कंपनीच्या या अजब नोटिसीनंतर स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देत सर्व माहिती जाणून घेतली. कर्मचाऱ्यांनी लग्न करावे की अविवाहित राहावे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांवर लग्नासाठी दबाव टाकू शकत नाही. हे कामगार कायद्याच्या विरोधात आहे, असे अधिकाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला सांगितले.