स्पॅम कॉलपासून सुटका; टेलिकॉम कंपन्यांना 10 लाखांपर्यंतचा दंड

स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजपासून सुटका व्हावी म्हणून  दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने नवीन नियम जारी केले आहेत. नव्या नियमांनुसार आता स्पॅम कॉल्सची संख्या योग्यरीत्या न सांगणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना थेट दोन ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. तसेच 10 डिजिट नंबरवरून कॉल करण्यास टेलिकॉम पंपन्यांना बंदी घालण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल. ट्रायने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना कॉल आणि एसएमएस पॅटर्नचे विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये असामान्यपणे जास्त कॉलची संख्या, कमी कॉल कालावधी आणि इनकमिंग-आऊटगोइंग कॉलचे प्रमाण यांचा समावेश आहे. यामुळे रिअल टाइममध्ये संभाव्य स्पॅमर्स ओळखणे सोपे होईल.

ट्रायने 10 अंकी मोबाईल क्रमांकाद्वारे व्यावसायिक संवाद साधण्यावर मर्यादा आणल्या आहेत. प्रमोशन कॉलसाठी ‘140’ क्रमांकाची मालिका किंवा नव्याने सुरू केलेली ‘1600’ मालिका व्यवहार आणि सेवा कॉलसाठी वापरली जाणार आहे.

ट्रायने एक नवीन डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) अॅपदेखील लाँच केले आहे. अॅपद्वारे तुम्ही स्पॅम मॅसेज ब्लॉक करू शकता, तक्रारी नोंदवू शकता आणि त्यावर केलेली कारवाई पाहू शकता.

बदललेले नियम फक्त टेलिकॉम नेटवर्कद्वारे येणाऱ्या मेसेज आणि कॉल्सना लागू होतील. व्हॉट्सअॅपसारख्या ओटीटी अॅपद्वारे येणारे मेसेज आणि कॉल या नियमांतर्गत येणार नाहीत.  

चुकीला माफी नाही

ट्रायने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा कंपनीने कोणतीही चुकीची माहिती दिल्यास दंड आकारला जाणार आहे. पहिल्यांदाच चुकीची माहिती दिल्याबद्दल 2 लाख रुपये दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा चुकीची माहिती दिल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. यानंतर प्रत्येक चुकीसाठी पंपन्यांना 10 लाख रुपये दंड भरावा लागेल. पहिल्यांदा उल्लंघन करणाऱ्यांची आऊटगोइंग सेवा 15 दिवसांसाठी बंद केली जाईल, पण वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सर्व सेवा एका वर्षासाठी खंडित होईल.