बोटावरची शाई दाखवा अन् हॉटेलमध्ये 15 टक्के सूट मिळवा!

मतदानाचा टक्का काढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृती आणि विविध उपक्रम राबवले जात असताना आता ‘आहार’सारख्या अनेक संस्था-संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. मतदारांनी मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवल्यास हॉटेल, थिएटरमध्ये 10 ते 15 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान दिवशीच्या सुट्टीच्या दिवशी केवळ सुट्टी एन्जॉय न करता मतदान करून आपले कर्तव्य बजावावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदारांना मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून या दिवशी सार्वजनिक सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली आहे.  शनिवार, रविवार या साप्ताहिक सुट्टीला सलग जोडून फिरण्यासाठी / पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी मतदानाचा दिवस हा साप्ताहिक सुट्टीला न जोडता स्वतंत्र असा बुधवारी ठेवण्यात आला आहे.

तीन दिवस सवलतीचे

मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. कारण मुंबई महानगरात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी होते. ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काढावे यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

मतदान वाढवण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना, संस्था, समूह हेदेखील पुढे आल्या आहेत. मतदान केल्यानंतर आपल्या बोटाकरील शाई दाखका आणि 20, 21,22 नोव्हेंबर या दिवसांमध्ये 10 ते 15 टक्के सवलत प्राप्त करा, अशा आशयाच्या या सवलती आहेत.