मित्राला भेटायला आलेल्या जर्मन महिलेवर कॅबचालकाने केला बलात्कार, हैदराबादमध्ये घडली धक्कादायक घटना

हैदराबादमध्ये एका 25 वर्षीय जर्मन महिलेवर कॅबचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात फिरायला घेऊन जातो असं सांगत पीडितेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पीडितेच्या तक्रारीवरुन कॅब चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा मित्र मीरपेट शहरात फिरण्यासाठी बाहरे पडले होते. याच दरम्यान एक कॅब ड्रायवर त्यांच्याजवळ आला आणि त्याने शहरातील पर्यटन स्थळे फिरवतो, असे सांगून त्यांना कॅबमध्ये बसवले. कॅबचालक शहरातील काही पर्यटन स्थळांवर त्यांना घेऊन गेला आणि त्यांचा विश्वास संपादित केला. संध्याकाळच्या वेळी पीडितेसोबत असणारा मित्र एका ठिकाणी उतरला आणि त्यानंतर फोटो काढण्याचा बहाना करत आरोपी पीडितेला घेऊन मामिदिपल्ली भागात घेऊन गेला. याच ठिकाणी संधी साधत आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि आरोपी तिथून पळून गेला. त्यानंतर पीडितेने सहकाऱ्यांना घटनेबाबत सांगितले आणि पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.