जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांनी संसद केली विसर्जित, जाणून घ्या काय आहे कारण…

जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक-वॉल्टर स्टेनमायर यांनी संसद विसर्जित केली आहे. चांसलर ओलाफ शोल्त्झ यांच्या युती सरकारने विश्वासदर्शक ठराव गमावल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी शुक्रवारी संसद विसर्जित करण्याचे आणि 23 फेब्रुवारी रोजी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. शोल्त्झ यांनी डिसेंबर 16 रोजी विश्वास मत गमावलं असून सध्याचं सरकार हे अल्पसंख्याक सरकार आहे.

ओलाफ शोल्त्झ यांचे तीन-पक्षीय आघाडी सरकार 6 नोव्हेंबरपासून संकटात आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती सध्या बिकट असल्याचं बोललं जात आहे. यातच अर्थव्यवस्थेला नवीन भरारी मिळावी म्हणून त्यांनी आपल्या अर्थमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. यानंतरच त्यांचं सरकार संकटात साडपलं.

यानंतर अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी संसदीय निवडणुका 23 फेब्रुवारीला, म्हणजेच मूळ नियोजित वेळेपेक्षा सात महिने आधी व्हाव्यात यावर सहमती दर्शवली. दुसऱ्या महायुद्धानंतरची राज्यघटना बुंडेस्टॅग म्हणजेच संसदेला विसर्जित करू देत नाही. त्यामुळे त्यांनी संसद विसर्जित करून निवडणुका बोलवल्या की नाही, हे स्टीनमेयर यांच्यावर अवलंबून आहे. हा निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे 21 दिवसांचा अवधी होता. संसद विसर्जित केल्यानंतर देशात 60 दिवसांच्या आत निवडणुका होणे आवश्यक आहे.