जिओ टॅगमुळे बोगस लाभार्थी उघड; केळी पीक विमा तपासणीत 77 शेतकरी अपात्र, 31 मार्च अंतिम मुदत

तालुक्यात हवामानावर आधारित फळपीक विमाअंतर्गत केळी लागवडीच्या तपासणीचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी 31 मार्चपर्यंत लागवडधारकांनी जिओ टॅग करणे बंधनकारक आहे. दरम्यान, शुक्रवारीपर्यंत झालेल्या तपासणीत 77 शेतकरी अपात्र ठरले असून त्यापैकी 56 शेतकरी बोगस आढळले, तर 21 ठिकाणी केळी पीकच अस्तित्वात नसल्याचे समोर आल्याने बोगस लाभार्थी उघड्य़ावर पडले आहेत. अद्याप 4147 शेतकऱ्यांची तपासणी प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

सन 2024-25 या वर्षात 25,792 शेतकऱ्यांनी 25,487.33 हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा संरक्षण घेतले आहे. मात्र प्रत्यक्ष लागवड व विमा घेतलेल्या क्षेत्रात तफावत जाणवू लागल्याने प्रत्यक्ष बांधावर जाऊन क्षेत्र तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 19,092 शेतकऱ्यांच्या 18,943.77 हेक्टर क्षेत्राची तपासणी झाली असून त्यातील 19,015 शेतकऱ्यांची 18,735.69 हेक्टर क्षेत्रफळ तपासणीअंती पात्र ठरले आहे.

तपासणीसाठी उर्वरित शेतकऱ्यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर याद्या प्रसिद्ध करूनही 2553 शेतकऱ्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. या शेतकऱ्यांचे एकूण 2479.93 हेक्टर क्षेत्र तपासणीसाठी बाकी आहे. अपात्र ठरलेल्या 77 शेतकऱ्यांमध्ये 21 शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी विमा घेतला तेथे प्रत्यक्ष पीकच आढळले नाही. त्यांचे एकूण क्षेत्र 22.17 हेक्टर इतके आहे, तर 56 शेतकरी बोगस आढळले. म्हणजेच नियमानुसार नोंदणी न करता विमा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच 203 शेतकऱयांनी 103 हेक्टरपेक्षा जास्त अतिरिक्त विमा घेतल्याचे 21 मार्चपर्यंत उघड झाले आहे.

अपात्र व बोगस शेतकरी रडारवर

विमा कंपनी आणि भुसावळ विभागातील कृषी सहाय्यकांच्या विशेष टीमकडून तपासणीचे काम सुरू आहे. शासनाने नोंदवलेल्या नियमानुसार अपात्र व बोगस ठरणाऱया शेतकऱ्यांवर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी बी. सी. वाळके यांनी स्पष्ट केले आहे. 31 मार्च हा जिओ टॅगिंगचा अंतिम दिवस आहे. ज्या शेतकऱयांनी अद्याप तपासणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा अन्यथा विमा रक्कम मिळण्यास अडचण येऊ शकते.