जनरल उपेंद्र द्विवेदी बनले 30 वे लष्करप्रमुख; मनोज पांडे यांच्याकडून स्वीकारला पदभार

हिंदुस्थानचे नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. निवृत्त जनरल मनोज पांडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे 30 वे लष्करप्रमुख असून 19 फेब्रुवारी रोजी ते लष्कराचे उपप्रमुख झाले होते. लष्करप्रमुख झाल्यावर द्विवेदी यांना लेफ्टनंट जनरलवरून जनरल पदावर बढती देण्यात आली. केंद्र सरकारने 11 जून रोजी त्यांना लष्करप्रमुख बनवण्याची घोषणा केली होती.

जनरल द्विवेदी यांनी जनरल मनोज पांडे यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जनरल मनोज पांडे हे आजच निवृत्त झाले आहेत. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ते 26 महिने लष्करप्रमुख होते. गेल्या महिन्यात सरकारने जनरल पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवला होता. लष्करप्रमुख बनण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम केले होते. त्यांच्या नियुक्तीमध्ये सरकारने ज्येष्ठतेचे तत्त्व पाळले आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ अधिकारी दक्षिणेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग आहेत.