इस्रायल आणि हमासमध्ये अखेर युद्धविराम लागू झाला, परंतु नियोजित वेळेपेक्षा सुमारे तीन तास उशीर झाला. सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणारा युद्धविराम दुपारी पावणेतीन वाजता सुरू झाला. इस्रायलने हमासवर युद्धविरामाच्या अटींचे पालन न केल्याचा आणि ओलिसांची नावे जाहीर केली नाहीत असा आरोप केला होता, परंतु आता हमासने तिघांची नावे जाहीर केली आहेत. पुढच्या काही आठवडय़ात डझनभर ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. 42 दिवस हा युद्धविराम असणार आहे.
तब्बल 471 दिवसांच्या बंदिवासानंतर अखेर अनेक इस्रायली ओलिसांची सुटका होण्याचा मार्ग युद्धविरामामुळे मोकळा झाला आहे. रोमी गोनेन, एमिली दामारी आणि हेरॉन स्टीब्रेचर अशी या ओलिसांची नावे आहेत. तत्पूर्वी इस्रायली मंत्रिमंडळाने शनिवारी हमाससोबतच्या युद्धबंदी कराराला मान्यता दिली होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने याची पुष्टी करणारे निवेदन जारी केले. दरम्यान, युद्धविराम करार संपेपर्यंत सर्व ओलीस परतू शकणार नाहीत अशी भीती इस्रायली नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ओलीस शारीरिकदृष्टय़ा अत्यंत कमपुवत झालेले असल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त होत आहे.
इस्रायल 700 कैद्यांना सोडणार
युद्धविराम करार तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे. इस्रायलमधील न्याय मंत्रालयाने 96 पॅलेस्टिनी कैद्यांची यादी जारी केली असून पहिल्या टप्प्यात त्यांची सुटका केली जाईल. यात 69 महिला, 16 पुरुष आणि 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इस्रायल 700 हून अधिक कैद्यांची सुटका करणार असून त्यांच्या नावांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
नेतन्याहू यांच्या पक्षाच्या दोन मंत्र्यांकडून युद्धबंदीला विरोध
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिपुड पक्षाचे मंत्री डेव्हिड अम्सालेम आणि अमिचाई चिमकली हे युद्धबंदीच्या विरोधात मतदान करणाऱया आठ मंत्र्यांमध्ये होते. सरकारमध्ये समावेश असलेल्या ओत्झ्मा येहुदित पक्षाच्या सहा मंत्र्यांनीही युद्धबंदीच्या विरोधात मतदान केले.
असा पूर्ण होणार युद्धविराम करार
- पहिल्या टप्प्यात हमास 33 इस्रायली सोडणार आहे, तर इस्रायल एका ओलिसाच्या बदल्यात रोज 33 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल.
- दुसऱया टप्प्यात म्हणजेच 16 व्या दिवशी 3 फेब्रुवारीपर्यंत जिवंत राहिलेल्या ओलिसांची सुटका केली जाईल. इस्रायल एक हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल.
- कराराच्या शेवटच्या टप्प्यात गाझाचे पुनर्वसन केले जाईल. हमासने मारलेल्या ओलिसांचे मृतदेहही इस्रायलकडे सोपवले जाणार आहेत.