तीन फेऱ्या मारून बोट धडकली; अपघाताचे शूटिंग करणाऱ्या गौतम गुप्तांनी सांगितला थरारक अनुभव

गेट वे ऑफ इंडिया येथून बुधवारी दुपारी ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीतून एलिफंटाला निघालेले प्रवासी नौदलाच्या स्पीड बोटीचा थरार पाहात होते. भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत स्पीड बोट धावत होती. काही जण मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपत होते. पण क्षणातच हे सगळं जीवघेणं बनेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. नौदलाची स्पीड बोट ‘नीलकमल’वर आदळली आणि होत्याचे नव्हते झाले. एकच हाहाकार उडाला. बुडणाऱ्या प्रवाशांनी मदतीसाठी टाहो फोडला.

मुंबईत राहणारे गौतम गुप्ता गाझीपूरहून आलेली आई रामजी देवी आणि बहीण रिंता यांना एलिफंटा लेणी दाखवण्यासाठी ‘नीलकमल’मधून निघाले होते. गौतम गुप्ता बोटीच्या वरच्या भागात बसून मोबाईलमध्ये शूटिंग करत होते. ते म्हणाले ‘आमची बोट मार्गस्थ होत असताना समोरून एक स्पीड बोट वेगाने आमच्या दिशेला येत होती. या स्पीड बोटीने ‘नीलकमल’भोवती तीन फेऱया मारल्या आणि त्यानंतर ती आमच्या बोटीवर धडकली. मी, रिंता आणि आई पाण्यात पडलो. मात्र, मला आणि रिताला अन्य बोटीवरील प्रवाशांनी वाचवले. आई कुठे आहे याची माहिती मिळाली नाही.

सागरी प्रवासाची धडकी

बी. अनिल कुमार (35) आणि अशोक नारकप्पा (48) हे दोघेही तेलंगणावरून मुंबईत कामानिमित्ताने आले होते. बी. अनिल कुमार यांनी कालच्या अपघाताचा धसका घेतला. भविष्यात कधीही प्रवासी बोटीतून प्रवास करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी

कुर्ला येथील नाथाराम चौधरी, गावावरून आलेले त्यांचे भाऊ सर्वांथा आणि जितू असे तिघे बोटीच्या वरच्या भागात बसले होते. बसलेल्या या तिघांनी लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारली. दुसऱ्या बोटीवरील प्रवाशांनी आपल्याला वाचवले, असे नाथाराम यांनी सांगितले. नाथाराम आणि जितूवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करण्यात आले.

आई-बाबांची काळजी

मालाड येथे राहणारे संतोषीदेवी आणि अन्साराम भाटी दाम्पत्य मुलगा तरुणला सोबत घेऊन एलिफंटासाठी निघाले होते. लाईफ जॅकेट घातल्यामुळे तरुण वाचला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आई-वडिलांचा पत्ता लागत नसल्याने तो बेचैन झाला.