गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची सुरुवात होणाऱया श्रीलंका दौऱयाची सुरुवात 26 जुलैपासून होत असून यात हिंदुस्थानचा संघ 3 वन डे आणि 3 टी-20 सामने खेळेल. या दौऱयात हिंदुस्थानला वन डे आणि टी-20 मालिकेसाठी नवे कर्णधार लाभणार असल्याचेही कळले आहे. आज बीसीसीआयने हिंदुस्थानच्या श्रीलंका दौऱयाच्या वेळापत्रकाची घोषणा करताना माहिती दिली.
हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना 26 जुलैला पाल्लेकल येथे खेळविला जाणार आहे. तर पहिली वन डे 1 ऑगस्टला कोलंबो येथे खेळवली जाईल. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजयानंतर सध्या हिंदुस्थानचा युवा संघ झिम्बाब्वे येथे 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळतोय. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हिदुस्थानी संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपल्यानंतर लगेचच हिंदुस्थान श्रीलंकेशी भिडणार आहे. या दौऱयात कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाने शेवटचा श्रीलंकेचा दौरा 2021 मध्ये केला होता. त्यावेळी हिंदुस्थानने एकदिवसीय मालिका जिंकली होती, पण टी-20 मालिकेत हिंदुस्थानला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.