बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाचवा आणि अंतिम सामना सिडनीमध्ये रंगणार आहे. मेलबर्न कसोटी गमावल्याने या मालिकेत हिंदुस्थानचा संघ 1-2 असा पिछाडीवर आहे. त्यामुळे सिडनीतील सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असेल. मात्र पर्थमधील विजयानंतर पुढील तीनही सामन्यात हिंदुस्थानची कामगिरी खास राहिली नाही.
कर्णधार रोहित शर्माचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरत आहे. मालिकेत जसप्रीत बुमराहने घेतलेल्या विकेटएवढ्या धावाही रोहितच्या बॅटमधून निघालेल्या नाहीत. त्यामुळे तो टीकेचा धनी ठरत असून त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही रंगत आहेत. आता याच संदर्भात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने सिडनी कसोटीआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहितबाबत एक मोठे विधान केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळताना दिसणार का? असा प्रश्न गौतम गंभीर याला विचारण्यात आला. या प्रश्नाला गंभीरने दिलेले उत्तर ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खेळपट्टी पाहून आम्ही उद्या (3 जानेवारी) अंतिम 11 खेळाडू ठरवू, असे गंभीर म्हणाला. या उत्तरामुळे रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार की नाही हा सस्पेन्स आहे. त्याच्या जागी शुभमन गिल याला संधी मिळू शकते असेही वृत्त आहे.
रोहित शर्मा गेल्या काही काळापासून फॉर्मात नाही. पर्थ कसोटीला वैयक्तिक कारणामुळे मुकल्यानंतर पुढील तीन कसोटीच्या 5 डावात मिळून त्याला फक्त 31 धावा काढता आल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर व्हाईटवॉश मिळालेल्या मालिकेतही रोहितने 91 धावा केल्या होत्या. गेल्या 15 डावात त्याने 11 च्या सरासरीने 164 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे सिडनी कसोटीत त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
आकाशदीप जायबंदी
दरम्यान, पाचव्या कसोटीपूर्वी हिंदुस्थानच्या संघाला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आकाशदीप याच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सिडनी कसोटीला मुकणार असल्याची माहिती गंभीरने दिली.