खूप झालं आता, संघाच्या रणनितीनुसार खेळणार नसाल तर ‘नारळ’ देणार; गंभीरचा पंत, कोहलीला इशारा

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत हिंदुस्थानी संघाची कामगिरी यथातथाच राहिली आहे. पर्थमधील विजयानंतर पुढील तिनही कसोटीत हिंदुस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांनी हत्यार टाकले. एखाद दुसरी खेळी वगळता एकही फलंदाज मैदानात जास्त काळ शड्डू ठोकू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मासह अनुभवी विराट कोहली याच्याही बॅटला गंज लागल्याचे दिसले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या हिंदुस्थानच्या आशा जवळपास मावळल्या आहेत.

मेलबर्न कसोटीमध्ये अखेरच्या दिवशी हिंदुस्थानला 340 धावांची आवश्यकता होता. बॅटिंग पिच असतानाही हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मधली फळीही कोसळली. यशस्वीने किल्ला लढवल्याने एकवेळ सामना अनिर्णित राहील अशी आशा होती. मात्र तो बाद झाल्यानंतर अवघ्या काही धावांमध्ये हिंदुस्थानचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या पराभवानंतर हिंदुस्थानच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणही बिघडले असून कोच गौतम गंभीर याने खेळाडूंचे कान उपटले आहेत.

गौतम गंभीर याने ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचा क्लास घेतला. नैसर्गिक खेळाच्या नावाखाली विकेट फेकणाऱ्या ऋषभ पंत, विराट कोहली सारख्या खेळाडूंवर गंभीरने संताप व्यक्त केला. बस झाले आता. संघाच्या रणनितीनुसार खेळणार नसाल तर अशा खेळाडूंना ‘थँक यू’ बोलणार अर्थात संघाबाहेर काढणार, असे गंभीर ड्रेसिंग रुममधील संवादावेळी म्हणाल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.

राहुल द्रविड पायउतार झाल्यानंतर 9 जुलै 2024 रोजी गौतम गंभीर हिंदुस्थानचा कोच झाला. गेल्या 6 महिन्यात हिंदुस्थानी संघाने अनेक चढउतार बघितले. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर हिंदुस्थानला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश मिळाला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही हिंदुस्थानी संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. मेलबर्न कसोटीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता हिंदुस्थानला कोणत्याही परिस्थितीत सिडनी कसोटी जिंकावी लागणार आहे. त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

46 वर्षे अभेद्य असलेला सिडनीचा किल्ला ढासळणार? डब्ल्यूटीसीचे आव्हान जिवंत राखण्यासाठी हिंदुस्थानला सिडनीत शेवटची संधी

नैसर्गिक खेळाच्या नावाखाली मर्जीने खेळण्याचा प्रयत्न

गौतम गंभीर याने नैसर्गिक खेळाच्या नावाखाली मर्जीने खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंना तंबी दिली. संघाची रणनिती आणि सामन्याची स्थिती न बघता आपल्या मर्जीप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न काही खेळाडू करतात. त्यामुळे गंभीरने संताप व्यक्त केला. याआधी कर्णधार रोहित शर्मा यानेही यावर भाष्य केले होते.

पंत, कोहलीवर निशाणा

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ऋषभ पंत आणि विराट कोहली बेजबाबदार फटका मारून बाद होत आहेत. विराट कोहली तर जवळपास 6 डावात विकेटमागे बाद झाला आहे. चौथ्या-पाचव्या स्टंपवरील चेंडूचा पाठलाग करताना विराट सातत्याने बाद होत आहे, तर ऋषभ पंत लॅप शॉट खेळताना बाद होत आहे. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात तर पंत पार्ट टाईम बॉलर हेडला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.