बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे क्रिकेटयुद्ध सुरू होण्यापूर्वी वाक्युद्ध रंगते आणि दोन्ही देशांतील दिग्गज माइंडगेम सुरू करतात. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल वारंवार मत मांडणाऱया आणि खूप काळजी असल्याचा दिखावा करणाऱया रिकी पॉण्टिंगला प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोलून काढले. त्यांनी विराटची आणि हिंदुस्थानी संघाची काळजी करण्याऐवजी स्वतःच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटची काळजी करावी, असा सल्ला आणि हल्ला गंभीर यांनी पत्रकार परिषदेत चढवला.
कोहलीला गेल्या पाच वर्षांत आपल्या लौकिकानुसार फलंदाजी करता आलेली नाही. त्याला केवळ दोनच शतके पूर्ण करता आली आहेत. त्याचा फॉर्म हिंदुस्थानी संघासाठी चिंतेचा विषय आहे. तसेच विराटने नेहमी जबरदस्त पुनरागमन केलेय आणि त्याला ते पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलियापेक्षा दुसरे कोणतेही उत्तम स्थान असू शकत नाही, असे मत पॉण्टिंगने बोलून दाखवले होते. गंभीर यांना विराटबाबत पॉण्टिंग यांना असलेल्या काळजीबाबत छेडले असता ते म्हणाले, पॉण्टिंग यांचे हिंदुस्थानी क्रिकेटशी काहीही देणेघेणे नाही. त्यांनी हिंदुस्थानऐवजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटची काळजी करावी, असा सल्ला दिला. मला विराट किंवा रोहितच्या फॉर्मची जराही चिंता नसल्याचे मत व्यक्त करत ते दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते दोघेही महान खेळाडू आहेत आणि दोघांनी देशासाठी अनेक पराक्रम रचले आहेत आणि भविष्यातही ते आणखी नवे विक्रम रचतील, असा विश्वासही व्यक्त केला. कोहली या वर्षभरात केवळ एकच अर्धशतक झळकवू शकला आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीत 70 धावा केल्या होत्या. कसोटीत विराटने आपले शेवटचे शतक जुलै 2023 ला वेस्ट इंडीजविरुद्ध साजरे केले होते.
…तर हिंदुस्थानचाच विजय
आशा आहे की, ऑस्ट्रेलिया आगामी महामालिकेत कोणत्याही मैदानात आपल्या आवडीची खेळपट्टी तयार करून घेणार नाही. हिंदुस्थान संघ आपल्या लौकिकास साजेसा आणि पूर्ण क्षमतेने खेळला तर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही मैदानात विजय मिळवू शकतो, असा विश्वासही व्यक्त केला. आमचा संघ कोणत्याही खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला हरवू शकतो, पण ऑस्ट्रेलिया कोणती खेळपट्टी तयार करणार आहे यावर आमचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे गंभीर यांनी स्पष्ट केले.
… तर बुमरा हिंदुस्थानचा कर्णधार
रोहित शर्मा हिंदुस्थानी संघाबरोबर निघाला नसला तरी तो पर्थ कसोटीपूर्वी संघाबरोबर असेल, अशी आशा गंभीर यांनी बोलून दाखवली. तरीही तो वैयक्तिक कारणास्तव पर्थला पोहोचला नाही तर अशा स्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमरा संघाचे नेतृत्व कळेल. त्याचबरोबर रोहितच्या अनुपस्थितीत सलामीलाही आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे आम्ही केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांच्यापैकी एकाला यशस्वी जैसवालसह सलामीला उतरवू, अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
हिंदुस्थानचा निम्मा संघ रवाना
ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी हिंदुस्थानचा निम्मा संघ शनिवारीच पर्थला रवाना झाला होता. त्यात विराट कोहलीसह यशस्वी जैसवाल, मोहम्मद सिराज, आकाश दीप, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू आधीच निघाले होते, तर उर्वरित खेळाडू आज मुंबईहून पर्थच्या दिशेने निघाले. विराट कोहली ऑस्ट्रेलिया गाठणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे.