हिंदुस्थानात अदानींना अटक होऊ शकत नाही, मोदी पूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत; राहुल गांधींनी तोफ डागली

भाजपाला मिळणारा सगळा निधी हा अदानींकडून येतो. भाजपाचे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत.  पंतप्रधानांनी ठरवलं तरी ते अदानींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. कारण मोदी पूर्णपणे अदानींच्या कंट्रोलमध्ये आहेत अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन हजार कोटींच्या लाच प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली.

कथित सौरऊर्जा कंत्राट लाच प्रकरणी उद्योगपती गौतम अदानी यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी दोन हजार कोटींचा घोटाळा करून देशाला फसवले आहे. पण पंतप्रधान मोदी त्यांची पाठराखण करत आहेत. इतक्या मोठय़ा घोटाळ्यांतर अदानी यांच्याविरुद्ध आपल्या देशात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि ती होणारही नाही. अदानी आणि मोदी एक आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

देशाबाहेरील कंत्राटासाठी मोदींची मदत

अदानी यांनी देश बळकावला आहे. देश त्यांच्या मुठीत आहे. देशातील विमानतळं, बंदरं, संरक्षण यंत्रणा अदानींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदानींची केंद्र सरकारबरोबर भागिदारी आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदी ज्या ज्या देशांचे दौरे करतात त्या देशांमध्ये अदानी यांना कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

जेपीसीद्वारे तपास व्हावा

देशातील ज्या राज्यांमध्ये अदानी समूहासोबत करार झालेत, त्यांचा तपास झाला पाहिजे. अदानींच्या या भ्रष्टाचाराबद्दल मी बोलत नाही, अमेरिकन एजन्सीनं तपासात या गोष्टी नमूद केल्या आहेत. हे प्रकरण खूपच गंभीर असून याचा जेपीसीद्वारे तपास झाला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

गौतम अदानी यांना आजच अटक व्हायला हवी. तसेच त्यांना वाचवणाऱ्या माधवी बुच यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांच्यावर चौकशी बसवायला हवी.

10-15 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले जात आहे. कोणीही गुन्हा केला तर त्याला तुरुंगात पाठवलं जातं. पण दोन हजार कोटींचा घोटाळा करूनही अदानींना काहीही होत नाही.

अमेरिकेत समोर आलेलं प्रकरण हे फक्त एक उदाहरण आहे. बांगलादेश, श्रीलंका, केनिया येथील प्रकरणे आहेत. मोदीजी जिथे जातात तिथे त्यांना अदानीजींचा व्यवसाय मिळतो.