गौतम अदानी पुन्हा आयपीएलच्या मैदानात; ‘हा’ संघ विकत घेण्यासाठी फिल्डिंग

हिंदुस्थानातील दोन सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांच्यात आता आयपीएलच्या मैदानातही स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी पुन्हा आयपीएलमधील गुजरात टायटन्स या फ्रेंचायझीमधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

‘ईटी’च्या अहवालानुसार, खासगी इक्विटी फर्म सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स आयपीएल फ्रेंचायझी गुजरात टायटन्समधील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठी तिची अदानी समूहाशी चर्चा सुरू आहे. ‘सीव्हीसी’ कॅपिटल पार्टनर्स आयपीएल फ्रेंचायझी गुजरात टायटन्समधील त्यांचे कंट्रोलिंग स्टेक विकण्यासाठी अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपसोबत बोलणी करत आहेत. याचा अर्थ ‘सीव्हीसी’ कॅपिटलला फ्रेंचायझीमधील बहुसंख्य हिस्सा विकायचा आहे आणि काही हिस्सा स्वतःकडे ठेवायचा आहे. गुजरात टायटन्स या तीन वर्षे जुन्या फ्रेंचायझीचे मूल्य 8 हजार ते 12 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते.

अदानीकडे क्रिकेट लीगमधील दोन संघ

अदानी समूह आधीच क्रीडा क्षेत्रात विशेषतः क्रिकेटमध्ये आहे. अदानी समूहाकडे महिला प्रीमियर लीग आणि ‘यूएई’मधील आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट लीगमधील संघ आहेत. अदानी समूहाने सर्वाधिक 1289 कोटी रुपयांची बोली लावून वुमेन्स प्रीमियर लीगची अहमदाबाद फ्रेंचायझी खरेदी केली होती. आता सीव्हीसी कॅपिटलसोबत अदानी समूहाचा करार झाला, तर आयपीएलच्या पुढच्या हंगामात अदानी आणि अंबानी यांच्यातील स्पर्धा क्रिकेटच्या मैदानावरही पाहायला मिळू शकते.