‘हा पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर’, आसाममध्ये पत्रकाराच्या अटकेबद्दल गौरव गोगोई यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

आसाममध्ये बँकेतील कथित आर्थिक अनियमिततेविरुद्धच्या निषेधाचे वार्तांकन करताना पत्रकार हुसेन मुझुमदार यांना अटक करण्यात आली. वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला अटक करणं हा पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर, असं म्हणत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. याची चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात गौरव गोगोई यांनी आसाम सहकारी अ‍ॅपेक्स बँक लिमिटेडमधील कथित आर्थिक घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. गोगोई म्हणाले आहेत की, संचालकांमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचाही समावेश आहे. भाजप आमदार विश्वजित फुकन हे त्याचे अध्यक्ष आहेत.

गौरव गोगोई यांनी त्यांच्या पत्रात पुढे लिहिले आहे की, “पत्रकार दिलवर हुसेन मजुमदार यांची अटक लोकशाहीविरोधी आहे. याची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी पोलीस अधिकारांच्या गैरवापराची चौकशी करणे आवश्यक आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि सार्वजनिक हिताच्या बाबींवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अन्याय्यपणे लक्ष्य करण्यापासून रोखणे महत्वाचे आहे.” दरम्यान, गौरव गोगोई यांनी हे पत्र 28 मार्च रोजी पंतप्रधान मोदींना हे पत्र लिहिले होते. मात्र त्यांनी ते रविवारी माध्यमांना उपलब्ध करून दिले.