गुजरातमध्ये केमिकल प्लांटमध्ये गॅस गळती, चार कामगारांचा गुदमरून मृत्यू

गुजरातमधील भरूच येथे केमिकल प्लांटमध्ये गॅस गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. राजेश कुमार मगंडिया, मुद्रिका यादव, सुचित प्रसाद आणि महेश नंदलाल अशी मृतांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

भरुच जिल्ह्यातील दहेज येथे शनिवारी रात्री गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड (जीएफएल) च्या उत्पादन युनिटमधील पाईपमधून विषारी वायूची गॅस गळती झाली. विषारी वायू पसरल्याने एक कंपनीचा कर्मचारी आणि तीन कंत्राटी कामगार बेशुद्ध झाले. चौघांनाही तात्काळ कंपनीच्या ऑनसाइट व्यावसायिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी चौघांना भरूचच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविवारी चौघांचाही मृत्यू झाला.

कंपनीच्या टीमने त्वरीत शोध गेत गॅस गळती नियंत्रणात आणली. कंपनीने चारही कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.