अनेकदा लॉटरी काढून देखील विरार बोळींज येथील म्हाडाची सुमारे 5 हजार घरे धूळखात पडली आहेत. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने अनोखी शक्कल लढवली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता कोटय़वधी रुपये खर्च करून म्हाडा या प्रकल्पात क्लब हाऊस, स्विमिंग पूल, गार्डन अशा अलिशान सुविधा देणार आहे. लवकरच टेंडर काढून या कामाला सुरुवात होणार आहे.
म्हाडाची राज्यभरात तब्बल 11 हजार 193 घरे धूळखात पडली असून यातील 4 हजारांहून अधिक घरे एकटय़ा विरार बोळींज येथे आहेत. धूळखात पडलेल्या या घरांमुळे म्हाडाचा सुमारे 3100 कोटी रुपयांचा निधी अडकला आहे. बोळींज येथील घरांच्या विक्रीसाठी लॉटरी व्यतिरिक्त एकगठ्ठा विक्री, प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य असे अनेक प्रयत्न म्हाडाने केले तरीही त्यात त्यांना यश आले नाही. कोकण मंडळाच्या यंदाच्या सोडतीत देखील ही घरे विक्रीसाठी आहेत. मात्र त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अर्जदारांना आकर्षित करण्यासाठी म्हाडा आता या प्रकल्पात अलिशान सुविधा उभारण्याच्या विचारात आहे.
बोळींज येथील घरांची विक्री होत नसल्याने म्हाडाचा मोठा निधी अडकला आहे. त्यातच या घरांच्या सुरक्षा आणि मेंटेनन्सवर कोटय़वधी रुपये खर्च होतात. तेच पैसे खर्च करून येथे अलिशान सुविधा पुरवल्या तर सध्या येथे राहणाऱया रहिवाशांना फायदा होईल तसेच अनेक नवीन अर्जदार येथे घर घेण्यासाठी आकर्षित होतील. बोळींजशिवाय जिथे जिथे जास्त प्रमाणात म्हाडाची घरे शिल्लक आहेत तेथे अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. या सुविधांचा कोणताही परिणाम घरांच्या किमतीवर होणार नाही. – अनिल वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा