
मानपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपोच्या आवारात कचरा हस्तांतरण करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. या प्रकल्पाला मानपाडावासीयांनी आज कडाडून विरोध करत चक्क जेसीबीखाली झोपून आंदोलन केले. यावेळी महापालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार राडा झाला. भाजपच्या स्थानिक नगरसेवकाने मिंधेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत जेसीबीवर दगडफेक केली. त्यानंतर कचऱ्याचे डंपर घेऊन पालिका अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे ठाण्यात कचरा पुन्हा पेटला असून कचरा फेकण्यासाठी ‘जाये तो जाये कहा’ अशी अवस्था प्रशासनावर आली आहे.
वागळे इस्टेट येथील सीपी तलाव येथे कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर मानपाडा येथील बस डेपोमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यानुसार पालिकेने आज दोन जेसीबी, सहा डंपर तैनात केले होते. दरम्यान, नागरिकांना कुणकुण लागताच त्यांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यानंतर पालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी नागरिकांनी दगडफेक करत जेसीबीसमोर झोपून आंदोलन केले.
कचरा समस्या मार्गी लावायची कशी?
वागळे इस्टेट येथील सीपी तलाव येथे कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे ठाणे पालिकेची चांगलीच गोची झाली आहे. मानपाडा येथे कचरा टाकण्याचा डाव स्थानिकांनी उधळून लावल्याने कचरा प्रश्न मार्गी लावायचा कसा, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे.
कचरा हस्तांतरण प्रक्रिया आज होणार होती. 90 टन कचऱ्यासाठी सात डंपर आणि दोन जेसीबी तैनात ठेवले होते. प्रत्येक प्रभाग समितीने कचऱ्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र आजचा विरोध ही दुर्दैवी घटना असून पालिकेच्या जागेवर विरोध होत राहिल्यास कचरा टाकणार कुठे?
मनीष जोशी (उपायुक्त, ठाणे पालिका)
■ वर्तकनगर प्रभागात 90 टन कचरा प्रतिदिन निर्माण होतो कचरा नऊ ते दहा घंटागाड्यांच्या माध्यमातून उचलण्यात येत असतो. त्यानुसार येथील हस्तांतरण केंद्रावर सात डंपर सज्ज ठेवण्यात आले होते.