सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन जल्लोषात होऊ लागले आहे. नामांकित मूर्तिकारांकडून आकर्षक गणेशमूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल असताना नाशिक कारागृहात घडणाऱ्या बाप्पांनाही नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे. कैद्यांनी बनवलेल्या आकर्षक मूर्तींना चांगली मागणी असून राजभवनातदेखील कारागृहात घडवलेली गणेशमूर्ती विराजमान होणार आहे.
नाशिक मध्यवर्ती कारागृहात यंदाही कैद्यांच्या कलेला वाव देण्यात आला. कलाकुसर करण्याची आवड आहे अशा कैद्यांना कारागृह प्रशासनाने संधी देत त्यांना इको फ्रेंडली शाडूच्या मातीचे बाप्पा बनविण्यास सांगितले. त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून दिल्यानंतर कैद्यांनी गेले काही दिवस प्रचंड मेहनत घेत बाप्पांच्या आकर्षक व सुबक मूर्ती बनवल्या. या गणेशमूर्तींना भक्तांकडून मोठी मागणी असून शेकडो मूर्तींचे बुकिंगदेखील झाले आहे.
मूषक वाहन, मोरेश्वर, टिटवाळा, कमळ पान आसन, गादी आसन, दगडूशेठ, लंबोदर, वक्रतुंड, गजमुख, सिंह फर्निचर, बालाजी, उंदीर रथ, राधाकृष्ण, शंकर-पार्वती अशा विविध रूपातले बाप्पा कैद्यांनी घडवले आहेत. या मूर्तींना ग्राहकांची प्रचंड मागणी असून उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी सांगितले.