चंद्रपुरात गणपती बप्पांची मूर्ती 84 वर्षांपासून विसर्जनाच्या प्रतीक्षेत; जाणून घ्या कारण…

देशात रामराज्य आल्याशिवाय विसर्जन करायचे नाही, असा संकल्प करीत चंद्रपुरातील काही युवकांनी सुमारे 84 वर्षांपूर्वी स्थापित केलेली गांधीजींच्या रूपातील गणेश मूर्ती अजूनही विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहे. 1940 मध्ये चंद्रपुरातील गांधी चौकात महात्मा गांधी यांची छवी असलेली गणेशाची मूर्ती तयार बसवण्यात आली. मात्र ब्रिटिशांनी उत्सव साजरा करण्यास मनाई केल्याने मूर्तीची विटंबना होईल, या भीतीने ही मूर्ती उचलून एका गोदामात ठेवण्यात आली. येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर कोतपल्लीवार यांच्या नजरेस ही मूर्ती पडली. अडगळीत पडलेली ही मूर्ती त्यांनी गांधी चौकलगत असलेल्या कन्यका मंदिरात स्थापित केली. तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळायचे होते. यामुळे ही मूर्ती स्थापन करताना तत्कालीन युवकांनी एक संकल्प केला की जोपर्यंत देशात रामराज्य येणार नाही, तोपर्यंत या मूर्तीचे विसर्जन करायचे नाही. तेव्हापासून आजपर्यंत ही मूर्ती कन्यका मंदिरात सुरक्षित जतन करून ठेवली आहे. रामराज्य अजूनही आलेले नसल्याने मूर्तीचे विसर्जन अशक्य झाले आहे, असे कन्यका मंदिराचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद कोतपल्लीवार सांगतात.