गेली 10 वर्षे सरकारी नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षीपासून सलग 5 वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता मंडळांना मागील 10 वर्षांत सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. मात्र, असे असले तरी दरवर्षी परवानगीचे नूतनीकरण करणे गरजेचे करण्यात आले आहे. दरम्यान, 6 ऑगस्टपासून मंडपांसाठी ऑनलाईन परवानगी द्यायला सुरुवात केली जाणार आहे. आतापर्यंत 1 हजार 237 मूर्तिकारांनी मंडपाच्या परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिका सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न करते. एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून संबंधित नियमांनुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱया मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल. दरम्यान, सार्वजनिक जागेवरील गणेशोत्सव मंडळांना मंडपाकरिता केवळ 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
500 टन मोफत शाडू माती वाटप
मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत मोफत शाडू मातीसाठी एकूण 217 मूर्तिकारांनी मागणी केली असून त्यांना आतापर्यंत सुमारे 500 टन मोफत शाडू माती देण्यात आली आहे. यामुळे शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करण्याचे प्रमाण यंदा वाढणार आहे, असा विश्वास उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी व्यक्त केला.