मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी एका संशयित प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 4.147 किलोग्रॅम वजनाचा गांजा (हायड्रोपोनिक विड) जप्त केला. प्रवाशाकडील एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
मुहम्मद पारंब (26) असे कस्टमने अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा प्रवासी केरळच्या कोझिकोड येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाचे काळ्या बाजारातील किंमत 4.14 कोटी रुपये इतकी आहे. पारंब हा बँकॉकहून डीडी-938 नॉक एअर एअरलाइन्सने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता.
मुहम्मदच्या हालचाली संशयास्पद असल्याने सीमा शुल्क विभागाच्या पथकाने त्याच्या ट्रॉली बॅगची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे हायड्रोपोनिक विड (गांजा) असलेली 10 प्लास्टिकची पाकिटे सापडली. सीमा शुल्क विभागाने ही पाकिटे जप्त केली आहेत. तसेच प्रतिबंधित गांजाची पाकिटे स्वीकारणाऱ्या अहमद के. पी. नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. दोन्ही आरोपींना एनडीपीएस कायद्यांतर्गत तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.