
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात 19 फेब्रुवारीला सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कुख्यात गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे यांचे फलक झळकविण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, इतरांचा शोध सुरू आहे.
ओंकार बाळासाहेब धारूरकर (रा. सोनार गल्ली, कर्जत) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात 19 फेब्रुवारीला सायंकाळी डीजेच्या दगदणाटात पाच मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या. त्यांतील पैलवान प्रतिष्ठान या मंडळाची मिरवणूक तख्ती दरवाजा येथे आली असता, एका तरुणाने कुख्यात गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा फोटो असलेला फलक झळकावला. त्या फलकाच्या पाठीमागे ‘जिहाद्यांचा बाप’ असा मजकूर असलेला मंत्री नीतेश राणे यांचाही फलक होता. ही दृश्ये प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाली. सोशल मीडियावर ती व्हायरल झाली. याबाबत कोतवाली ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी 20 फेब्रुवारीला रात्री उशिरा फिर्याद दिली. या फिर्यादीवरून ओंकार धारूरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या मिरवणुकीत आणखी एका मंडळापुढे नाचताना एकाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो असलेला फलक झळकवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
गुन्हेगारांना तत्काळ अटक करा
मिरवणुकीत नथुराम गोडसे व कुख्यात गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटो नाचवणाऱ्या गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ध्वनिप्रदूषणप्रकरणी पाच मंडळांच्या अध्यक्षांसह डीजेचालकांवर गुन्हा
शिवजयंतीनिमित्त शहरात 19 फेब्रुवारीला सायंकाळी काढलेल्या मिरवणुकीत सर्वोच न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता डीजे, डॉल्बी स्पीकर लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या पाच मंडळांच्या अध्यक्षांसह डीजेचालकांवर कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तोफखाना पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल राहुल म्हस्के, सचिन लोंढे यांच्या फिर्यादीवरून साई संघर्ष युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष अंबादास पंधे, डीजेचालक नागेश मच्छिंद्र लोखंडे, शंभूराजे प्रतिष्ठान व जनता गॅरेज टी पॉइंट मंडळाचे अध्यक्ष प्रतीक नवनाथ तागड, डीजेचालक योगेश कामटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल विशाल दळवी, रामनाथ हंडाळ, विजय काळे यांच्या फिर्यादीनुसार पैलवान प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष रोहित रमेश सोनेकर, डीजेचालक ईश्वर तानाजी महाडिक, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित सुरेश भगत, डीजेचालक कुंदन भालचंद्र विधाते, शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विपुल दीपक पवार, डीजेचालक संकेत जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.