शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी गँगस्टर अबू सालेमने आपली शिक्षा माफ करण्यासाठी आणि तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने सरकारला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गँगस्टर अबू सालेम याला मुंबई बॉम्बस्पह्ट खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तळोजा येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सालेमने माफी व मुदतपूर्व सुटकेसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅड. फरहाना शाह यांच्यामार्फत सालेम याने ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने या याचिकेप्रकरणी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 26 मार्चपर्यंत तहकूब केली.