जालन्यात व्यापार्‍याला लुटणार्‍या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

जालन्यातील जुना मोंढयात व्यापार्‍याला लुटणार्‍या 5 आरोपीना जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातुन 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलीस ठाणेची संयुक्त कारवाई करुन जप्त केला आहे. व्यापारी घनशाम भगतराम अग्रवाल (रा. संभाजीनगर, जालना) यांना जुना मोंढा परिसरात 27 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास 4 अज्ञात आरोपींनी मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील 12 लाख 50 हजार रुपये हिसकावुन नेले होते. अग्रवाल यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना सुचना दिल्या होत्या. यानुषंगाने दोन पथके स्थापन करुन गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही चोरी ही जालना तालुक्यातील मानदेऊळगाव येथील गोपाल गणेश गायकवाड व सुनिल महादु पवार (रा.मानदेऊळगांव, जालना) यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केली आहे. 29 डिसेंबर रोजी तांत्रीक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे गोपाल गणेश गायकवाड व सुनिल महादु पवार (रा.मानदेऊळगांव, जालना) यांचा शोध घेत असताना ते गोवा येथे 31 डिसेंबर साजरी करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली.

ते राजुर-भोकरदन रोडने क्रुझर गाडीने जात असल्याचे दिसून आल्याने त्यांचा पाठलाग करुन अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून चोरी झालेल्या रोख रक्कमेपैकी 5 लाख 50 रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची एक गुन्हयात वापरलेली मोटार सायकल, 20 हजार रुपये किंमतीचे आरोपीतांचे दोन मोबाईल असा एकुण 6 लाख 30 हजार 50 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी.डी. शिंदे करीत आहेत.

उर्वरित फरार आरोपी हे छत्रपती संभाजीनगर येथे गेल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने त्यांचा एम.आय.डी.सी. वाळुज पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर यांच्या मदतीने आरोपी सुमित ऊर्फ ओम शैलेश डुरे (रा. कसबा जुना जालना),कैलास ऊर्फ कॉलेज राजु गायकवाड (रा.कैकाडी मोहल्ला,जुना जालना), सचिन ऊर्फ माया हरीचंद्र जाधव (रा.कैकाडी मोहल्ला जुना जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नमुद आरोपींची विचारपुस केली असता त्यांनी 21 डिसेंबर रोजी जाफराबाद ते टेंभुर्णी रोडवरील वेअर हाउस जवळवरील पाच आरोपी व त्यांचा एक साथीदार यांनी मिळुन जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.