
गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘बेस्ट’कडून तात्पुरत्या स्वरूपात वीज मीटर मिळवण्यासाठी अनेक आस्थापनांच्या परवानग्या घ्याव्या लागत असल्याने मनःस्ताप होतो. त्यामुळे ‘बेस्ट’ प्रशासनाने ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केली आहे.
विविध आस्थापनांच्या परवानग्या मिळाल्याशिवाय बेस्ट उपक्रम मीटर देत नाही. तसेच तात्पुरता मीटर लावताना बेस्ट उपक्रम रहिवाशांच्या मीटर केबिनमध्ये मीटर लावल्यामुळे विद्युत पुरवठा दाब वाढवून सदर इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे ज्या गणेशोत्सव मंडळाची विद्युत दाबाची जास्त मागणी आहे अशा मंडळांना वेगळा मिनी पिलर देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेकडून शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी यांच्या सूचनेनुसार बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी ‘बेस्ट’चे (विद्युत पुरवठा) सहाय्यक महाव्यवस्थापक बिलाल शेख यांना निवेदन देऊन गणेशोत्सव मंडळांना सुविधा देण्याची मागणी केली. त्याला प्रशासनाने सहमती दर्शवली आणि तत्काळ त्याबाबत आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
काळाचौकीचा महागणपती म्हणून ओळखल्या जाणाऱया काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या बाप्पाचा पाटपूजन सोहळा मंगळवारी विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पराडकर, प्रमुख कार्यवाह निखिल जाधव, कार्याध्यक्ष अतुल मेस्त्राr, खजिनदार सिद्धेश सावंत आदी यावेळी उपस्थित होते.