बदलापूरच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘ती’च्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. याची नितांत गरज लक्षात घेत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या उत्सवातून महिला संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्याचा वसा घेतला आहे. ‘ती’च्या रक्षणासाठी बाप्पाने बळ द्यावे, अशी प्रार्थना करण्यासाठी अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्रीकृष्ण अवतारातील गणरायाला विराजमान केले आहे.
मुंबई शहर व उपनगरांतील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी विविध सामाजिक संदेश देतात. ऐतिहासिक देखावे उभारले जातात. याच सामाजिक जाणिवेतून यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी महिला संरक्षणाच्या विषयाला प्राधान्य दिले आहे. दक्षिण मुंबईतील ‘मलबार हिलचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी महाराजाच्या रूपातील बाप्पाची प्रतिष्ठापना करते. मंडळाने या वर्षी पहिल्यांदा श्रीकृष्ण आवतारातील बाप्पा विराजमान केला आहे.
राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांसाठी असुरक्षित वातावरण बनले आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्ण महिलांचे रक्षक बनले होते. त्याचप्रमाणे आता श्रीकृष्ण बनून महिला संरक्षणार्थ खंबीर साथ देण्याची गरज आहे. हा संदेश देण्यासाठी आम्ही श्रीकृष्ण अवतारातील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले, असे ‘मलबार हिलचा राजा’ गणेशोत्सव मंडळाचे संयोजक नीलेश पटेल यांनी सांगितले.
खेतवाडी 13 वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेदेखील महिला सुरक्षेच्या हेतूनेच यंदा श्रीकृष्ण अवतारातील बाप्पाच्या मूर्तीला पसंती दिली आहे. ‘मुंबईचा अनंत’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने ‘लाडक्या बहिणीं’च्या संरक्षणासाठी श्रीकृष्णाचा धावा केला आहे. महिला सुरक्षेचाच विषय डोळ्यासमोर ठेवून यंदा श्रीकृष्ण अवतारातील बाप्पा मंडपात दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया मंडळाचे सेक्रेटरी चंदन माने यांनी दिली.
गणसेवकांची फौज मंडपात सज्ज
महिलांच्या सुरक्षेला कुठल्याही प्रकारे धक्का बसू नये म्हणून मंडळांनी सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. रांगेची शिस्त राखणे, सुरक्षा रक्षक तैनात करणे, मंडपात सीसीटीव्ही आदी उपाययोजना मंडळांनी केल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मंडळांच्या ठिकाणी गणसेवकांची मोठी फौज महिलांच्या संरक्षणासाठी सज्ज राहणार आहे.
समन्वय समितीच्या मार्गदर्शक सूचना
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही मुंबई शहरातील सर्वच गणेशोत्सव मंडळांना महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ‘लाडकी बहिणीं’साठी फक्त योजनांची घोषणा न करता त्यांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे हा संदेश गणेशोत्सव मंडळांकडून दिला जात आहे.