>> निवेदिता मदाने-वैशंपायन
‘महाराष्ट्रातील मानाचे गणपती’ वगैरे अशी पद्धत दिल्लीतील बाप्पांना नाही. दिल्लीतील प्रत्येक गणपती माननीयच. बुद्धी देणारा प्रत्येक बाप्पा हा मानाचा असणारच या भावनेतून आपण इतर मंडळांपेक्षा आपण वेगळे काय देऊ शकतो याकरिता मात्र दिल्लीत चुरस असते.
‘पुणे तेथे काय उणे’ जसे म्हटले जाते तसे आज आम्हा दिल्लीकरांना ‘राजधानीत कशाची कमी…?’ ही उपरोक्ती नाही तर वास्तविक परिस्थिती असावी याचीच प्रचीती आम्हा बृहन्महाराष्ट्रीयांना दिल्ली आणि दिल्लीस्थित विविध परिसरातील (त्यालाच दिल्ली एनसीआर म्हणतात) गणेशोत्सवांच्या मांडवाखालून जाताना दिसून येते. मराठी माणूस प्रांतापासून शिक्षण किंवा नोकरी व्यवसायाकरिता दूर येतो. परप्रांतात स्थिरावताना एकीकडे आपली संस्कृती, प्रथा-परंपरा आपल्यापासून दुरावते का या शंकेने अस्वस्थ होतो. अशा वेळी यापूर्वीच्या पिढय़ा, काही कुटुंबे यांनी एकत्रित येत बृहन्महाराष्ट्रात रीतसर काही सार्वजनिक मंडळांची स्थापना केली. प्रत्येक मंडळांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. दिल्ली आणि एनसीआर द्वारका, फरिदाबाद, नोएडा येथील काही मंडळांतून विधिवत गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा, आरती कार्यक्रम आणि मिरवणूक विसर्जन हे सारे उत्साहाने पार पडते. मात्र या मंडळांमध्ये आपण वेगळे काय देऊ शकतो याकरिता मात्र चुरस असते.
दिल्ली हे शहर नसून राज्याच्या दर्जापर्यंत भौगोलिकदृष्ट्याही पसरलेले असल्याने वेगवेगळ्या मंडळातून कार्यक्रमांचे आयोजन होते. या सगळ्याच मंडळातून महाराष्ट्रातील लोकधारा, दर्जेदार मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी, स्थानिक उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची तळमळ, तर काही मंडळांचा अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा ‘महाप्रसाद’ दिल्लीपासून ते थेट त्याच्या गावातील गल्लीपर्यंतच्या गणेश मंडळांची आठवण ‘मराठी माणूस’ला करून देतो. याशिवाय संस्कृतीचे आदानप्रदान होऊन नॉन महाराष्ट्रीयनांनाही बोटं चाखत महाप्रसादातील व्यंजनांची कृती जाणून पदार्थ करून बघण्यास उद्युक्त करतो.
राजधानीतील पंधरा वर्षांच्या माझ्या वास्तव्यात सुरुवातीला काही महिने दिल्ली परिचित होईपर्यंत पूर्व दिल्ली येथील आनंदविहारचे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ अनेकांना मायेची पखरण करते. त्यातील मी पण एक होते. पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ ‘आपले आपण’ या कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यातून पाठांतर, भाषण, गाणे, नृत्याकरिता हक्काचे व्यासपीठ असते. याच व्यासपीठाने पुढे अनेक व्यावसायिक कलाकारही दिल्लीला दिले आहेत. पूर्व दिल्लीतील आणखी एक प्रसिद्ध गणेमंडळ श्री गणेश सेवा मंडळ येथे आरतीला येणारे विविध अतिथी आणि अध्यात्मिक गुरू यांची भजनसंध्या हे वैशिष्ट्य असते. या मंडळाचे अध्यक्ष संस्थापक महेंद्र लढ्ढा आहेत. दक्षिण दिल्लीत सार्वजनिक उत्सव समिती दरवर्षी दिल्ली हाट आयएनए येथे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील गाजलेली नाटकांची मेजवानी दिल्लीकर मराठी रसिकांना देणे. आज सगळ्यांचे लाडके कलाकार प्रशांत दामले यांच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे आयोजन केले आहे. यंदा सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी नीना हेजीब, उद्योजक वीरेंद्र उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव आहे.
मध्य दिल्लीत एकूण पाच गणपतींची स्थापना होते. विशेषत चांदणी चौक या मुस्लिम बहुल भागात हा गणेशोत्सवपार पडतो. हे गणेश मंडळ दरवर्षी महाराष्ट्रातील लोकधारा लावणीचंही आवर्जून आयोजन करते. तेथून काही अंतरावर सोनं-चांदी गाळण्याची प्रकिया करणारे महाराष्ट्रातून येऊन करोल बागेत स्थिरावलेले कारागीर दोन मंडळांतून गणेशोत्सव साजरा करतात. हा सुवर्णकार समाज सांगली, सातारा भागातील आहे. इथे घरगुती वातावरणातील पारंपरिक हळदी-कुंकूचे आयोजन असते. याच मध्यवर्ती दिल्लीत फैज रोडवर मराठा मित्र मंडळातर्फे चौगुले पब्लिक स्कूल ही शाळा आहे. येथे पारंपरिक लोककलेचा मुंबई येथील पन्नास कलाकारांच्या संचातील ‘महाराष्ट्राचा बाणा’ हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रीयन व्यवस्थापनाच्या या शाळेत विद्यार्थी जरी अमराठी भाषिक व मुस्लिम बहुल असले तरी गणोशोत्सवानिमित्त आयोजित आरास-देखावा, चित्रकला-हस्त शिल्पकलेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आकर्षक गणपतीची मूर्ती चित्रे तयार करतात. यंदाची संकल्पना लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव ही आहे.
येथून जवळच पहाडगंज येथे बृहन्महाराष्ट्र भवन आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या गरजूंकरिता माफक दरात निवासाची येथे सोय होते. येथेही बाप्पांची स्थापना केली जाते. येथील वैशिष्टय़ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, हुशार होतकरू विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र बहुल रहिवासी असलेल्या पश्चिम विहार आणि आनंद नगर या सोसायटीत गणेशोत्सव, आनंदमेळा, अंताक्षरी यांचे आयोजन केले जाते.
मध्यवर्ती दिल्लीतील ल्युटन्स झोन येथील नॉर्थ ब्लॉकमध्ये माय होम इंडियाचे सुनील देवधर यांच्या घरी दहा दिवस ‘समरसता’ बाप्पांचे आगमन होते. यात समाजातील विविध वर्गातील प्रतिनिधींकडून आरती केली जाते. अगदी सफाई कामगार ते तृतीय पंथीयांचाही येथे सन्मान केला जातो. यात वैशिष्टय़पूर्ण महाराष्ट्रातील पदार्थांची तर रेलचेल असतेच याशिवाय उकडीचे मोदक प्रसाद म्हणून प्रत्येकाला दिला जातो. याकरिता दहा दिवस सुनील देवधर यांच्या घरी पुणे येथील दोघी ‘मराठे’ भगिनी आवर्जून उपस्थित असतात.
सगळ्यांचा हक्काचा आणि मराठी पत्रकारांचा लाडका बाप्पा जुन्या महाराष्ट्र सदनातील हिरवळीवर वाजतगाजत दहा दिवसांकरिता विराजमान होतो. इथल्या महाप्रसादाचा लाभ घेण्यास दिल्लीभरातून भाविक येतात. इथे महाराष्ट्रातील लोकधारा, वाद्य झांज पथक यांच्या सादरीकरणाने मंडी हाऊस येथील परिसर दुमदुमून जातो.
दिल्लीबाहेर तितकंच प्रतिष्ठेचं आयटी हब असलेल्या गुरुग्राममधील सार्वजनिक गणेशोत्सव समिती नेहमीच अग्रेसर असते. यंदा प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांची गाण्याची मैफल ‘मर्म बंधातील ठेव’, ‘सम्या सम्या मैफलीत माझ्या’ हा कलाकार समीर चौगुले यांचा कार्यक्रम सादर झाला. या मंडळातील उत्साही पदाधिकारी कार्यक्रमानंतर होणारा उशीर पाहता रसिकांची तिथेच रहाण्याचीही सोय करतात. ग्रेटर कैलास येथील अलकनंदा येथील दोन दिवसीय बाप्पांना आशा भोसले यांनी गायलेल्या ‘चतुरस्र आशा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सगळ्यांचा लाडका श्री गणेश, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुखहर्ता, बुद्धिदाता गणपती त्याचे आगमन ते विसर्जन मिरवणूक हा एक उत्सव भक्तांना गुण्यागोविंदाने एकत्र आणतो. तिथल्या विस्तारलेल्या मराठी समाजाला साद घालतो. बाप्पांचे दर्शन, स्नेहीजनांच्या भेटी, गप्पागोष्टी, गाण्याच्या मैफली, विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन ते अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून परप्रांतीयांना मिळालेलं ज्ञान त्यावर आधारित बाप्पांची भक्ती याविषयीच्या गमतीजमती रंगवून एकमेकांना ऐकवणं हेही बृहन्महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असते. येथील अमराठी मंडळी गणपतीच्या आरतीनंतर मूळ मराठी माणूस जो आरतीनंतर कर्पूरगौरं म्हणतो तेव्हा ‘हिंदी’ भाषिक त्यांच्या शिरस्त्यानुसार थेट ‘ओम जगदीश हरे’ सुरू करतो आणि एका सुरातील आरती नकळत बदलत गंमत गोंधळ उडतो. अशा हास्याच्या क्षणांचे आम्ही नेहमीच साक्षीदार ठरतो. महाराष्ट्रापासून दूर राहत अशा उत्सवांचं साक्षीदार होणं हेच आपल्या संस्कृतीच्या, सोहळ्याच्या अधिक जवळ नेणारं असतं. “गणपती बाप्पा मोरया त्याकरिता पुढच्या वर्षी लवकर या!’’
– [email protected]
(लेखिका दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार आहेत.)